मुंबई : काळाचौकी येथील अभ्युदयनगर पुनर्विकास कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी (सी अँड डी) अर्थात खासगी विकासकामार्फत करण्यात येणार आहे. त्यानुसार विकासकाच्या नियुक्तीसाठी लवकरच निविदा प्रसिद्ध केली जाणार असल्याचे म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र आता ही निविदा प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. म्हाडाच्या आराखड्यानुसार अभ्युदयनगरमधील रहिवाशांना ४९९ चौ. फुटाचे घर देण्यात येणार आहे. मात्र ४९९ चौ. फुटाचे घर रहिवाशांना मान्य नसून नियमानुसार ७४० चौ. फुटाचे घर देय आहे. त्यामुळे देय क्षेत्रफळाचे घर मिळावे अशी रहिवाशांची मागणी आहे. त्या अनुषंगाने बदल करत आता निविदा काढण्याची तयारी मुंबई मंडळाने सुरु केली आहे. त्यामुळे निविदेस आता काहीसा वेळ लागणार आहे.
अभ्युदयनगर वसाहत ३३ एकरवर वसली असून ४९ इमारतींचा समावेश आहे. त्यात ३३५० रहिवासी आहेत. अभ्युदयनगरचा रखडलेला पुनर्विकास मार्गी लावण्याची जबाबदारी मुंबई मंडळाकडे आली आहे. त्यानुसार मंडळाने मोतीलाल नगर पुनर्विकासाच्या धर्तीवर सी अँड डी प्रारुपानुसार अभ्युदयनगरचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या प्रकल्पाच्या व्यवहार्यतेनुसार रहिवाशांना ४९९ चौ. फुटाचे घर देण्याचा निर्णय मंडळाने घेतला. त्यानुसारच सी अँड डी साठी निविदा काढण्याची तयारी मंडळाने सुरु केली. मात्र अभ्युदयनगरमधील रहिवाशांसाठी काही दिवसांपूर्वी म्हाडा भवनात प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी रहिवाशांनी ४९९ चौ. फुटाच्या घराला कडाडून विरोध केला. ३३(५) अंतर्गत पुनर्विकास प्रकल्प राबविताना आम्हाला ७४० चौ. फुटाचे घर देय आहे अशी भूमिका रहिवाशांनी घेतली. त्याचवेळी संचित निधीही वाढवून २५ लाख करावा अशीही मागणी रहिवाशांनी केली आहे.
हेही वाचा – मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षा २३ ऑक्टोबरपासून
रहिवाशांच्या मागणीनुसार ७४० चौ. फुटाचे घर देता येणार नाही. या क्षेत्रफळाचे घर दिल्यास प्रकल्प व्यवहार्य ठरणार नाही. विकासक पुढे येणार नाहीत अशी म्हाडा अधिकाऱ्यांची भूमिका आहे. मात्र, असे असले तरी रहिवाशांच्या मागणीनुसार किती क्षेत्रफळाचे घर देता येईल याचा विचार मंडळाकडून सुरु आहे. त्यामुळेच आता निविदा प्रक्रिया तुर्तास लांबणीवर टाकण्यात आल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. घराचे क्षेत्रफळ ठरल्यानंतरच निविदा प्रसिद्ध केली जाईल असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान ६८८ चौ. फुटाचे घर देण्याचा विचार मंडळाचा आहे. मात्र यावर अद्याप निर्णय झालेला नाही. तर याच क्षेत्रफळानुसार निविदा प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.