मुंबई महानगरपालिकेने भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातच (राणीची बाग) झेब्रा, जिराफ, जॅग्वार आणि चित्ता आदी वन्य प्राण्यांचे मुंबईकरांना दर्शन घडावे यासाठी महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. मात्र या प्राण्यांसाठी विशिष्ठ प्रकारचे पिंजरे तयार करण्यासाठी दोन वेळा मागविलेल्या निविदांना प्रतिसाद मिळू शकलेला नाही. परिणामी, दिवळीनंतर पुन्हा एकदा फेरनिविदा जारी करण्याचा निर्णय प्राणिसंग्रहालयाच्या प्रशासनाने घेतला आहे. यामुळे झेब्रा, जिराफ, जॅग्वार, चित्ता दर्शन लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा : विश्लेषण: आपण रोज किती तास झोप घ्यायला हवी? कमी किंवा जास्त झोपेमुळे शरीरावर कसा परिणाम होतो जाणून घ्या

मुंबईमधील राणीच्या बागेत वन्य प्राण्यांचे ‘याची देही याची डोळा’ दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. तसेच उद्यानातील दुर्मिळ वृक्ष-वेलींचा अभ्यास करण्यासाठी मोठ्या संख्येने वनस्पती शास्त्राचे विद्यार्थी येथे येतात. परिणामी, पर्यटकांसाठी प्राणिसंग्रहालय, तर विद्यार्थ्यांसाठी उद्यान आकर्षण बनले आहे. काही वर्षांपूर्वी राणीच्या बागेतील वन्य प्राणी – पक्ष्यांची संख्या रोडावली होती. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने राणीच्या बागेच्या नूतनीकरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. या प्रकल्पाअंतर्गत देश-विदेशातील वन्य प्राणी, पक्ष्यांसाठी राणीच्या बागेत विशिष्ठ प्रकारचे पिंजरे तयार करण्याचा, प्राण्यांसाठी रुग्णालय उभारण्याचा आणि अन्य काही छोटे-मोठे प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार नूतनीकरणाला सुरुवात झाली. राणीच्या बागेत दाखल झालेले हम्बोल्ट पेंग्विन मुंबईकरांसाठीच नव्हे, तर मुंबईला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षण बनले आहेत. इतकेच नव्हे तर हम्बोल्ट पेंग्विन दाखल झाल्यानंतर राणीच्या बागेच्या महसुलात लक्षणीय वाढही झाली आहे.

हेही वाचा : राज्यातील २,९०२ बसगाड्यांमध्ये नियमांची पायमल्ली; १,१३७ खासगी बसगाड्यांमधील अग्निशमन यंत्रणा बंद

राणीच्या बागेला लागूनच असलेला मफतलाल कंपनीचा एक मोठा भूखंड मुंबई महानगरपालिकेला मिळाला आहे. राणीच्या बागेच्या विस्तारासाठी या भूखंडाचा वापर करण्यात येणार आहे. याच भूखंडावर झेब्रा, जिराफ, जॉग्वार, चिता आदींसाठी विशिष्ठ प्रकारचे पिंजरे उभारण्यात येणार आहेत. वन्य प्राणांसाठी या पिंजऱ्यांमध्ये कृत्रिमरित्या अनुकूल असे वातावरण तयार करण्यात येणार आहे. महानगरपालिकेने या पिंजऱ्यांची निर्मिती करण्यासाठी यापूर्वी दोन वेळा निविदा मागविल्या होत्या. मात्र त्याला प्रतिसादच मिळाला नाही. त्यामुळे दोन्ही वेळे निविदा प्रक्रिया रद्द करावी लागली. तसेच करोनामुळे दोन वर्षे कारभारावर परिणाम झाला. आता पुन्हा एकदा या पिंजऱ्यांच्या निर्मितीसाठी फेरनिविदा मागविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिवळीनंतर निविदा मागविण्यात येणार असल्याची माहिती प्राणिसंग्रहालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा : पॅरिसवरून आले १५ कोटींचे अंमलीपदार्थ; नायजेरियन नागरिकासह तिघांना अटक

दरम्यान, या पिंजऱ्यांची यशस्वी निर्मिती झाल्याशिवाय या वन्य प्राण्यांना राणीच्या बागेत आणणे शक्य होणार नाही. पिंजऱ्यांच्या निर्मितीपासून वन्य प्राणी राणीच्या बागेत दाखल होण्यासाठी तीन-साडेतीन वर्षांचा कालावधी लागेल, अशी शक्यताही या अधिकाऱ्याने वर्तविली. परिणामी, मुंबईकर आणि मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना झेब्रा, जिराफ, चिता, जॅग्वारच्या दर्शनासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

झेब्रा, जिराफ, चित्ता, जॉग्वारसाठी विशिष्ठ प्रकारचे पिंजरे तयार करण्यासाठी दिवाळीनंतर तिसऱ्यांदा निविदा मागविण्यात येतील. – डॉ. संजय त्रिपाठी,संचालक, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय