मुंबईकरांचा गच्चीवर पाटर्य़ा साजऱ्या करण्याचा मार्ग मोकळा

मुंबईच्या २०१४-३४च्या सुधारित विकास आराखडय़ाच्या प्रारूपातील विकास नियंत्रण नियमावलीमध्ये गच्चीवरील हॉटेलचा समावेश करीत पालिका आयुक्तांनी शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्यास हातभार लावला आहे. या निर्णयामुळे केवळ हॉटेल्स, पंचतारांकित हॉटेल्स आणि लॉजच्या इमारतीच्याच नव्हे तर व्यावसायिक इमारतींच्या गच्चीवर हॉटेल सुरू करता येणार असून भविष्यात मुंबईकरांना या इमारतींच्या गच्चीवर पाटर्य़ा साजऱ्या करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

इमारतींच्या गच्चीवर हॉटेल सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी महापौर स्नेहल आंबेकर यांना काही महिन्यांपूर्वी पत्र पाठवून केली होती. त्यानुसार पालिका प्रशासनाने वरील निर्णय घेतला आहे. विकास नियंत्रण नियमावलीमध्ये गच्चीवरील हॉटेलचा समावेश करण्यात आल्यामुळे पूर्ण व्यावसायिक, हॉटेल्स आणि लॉजच्या इमारतींच्या गच्चीवर हॉटेल सुरू करता येणार आहे. मात्र गच्चीवरील हॉटेलमध्ये प्रसाधनगृह आणि ओटय़ाशिवाय अन्य कोणतेही बांधकाम करता येणार नाही, असे बंधन विकास नियंत्रण नियमावलीत घालण्यात आले आहे. मात्र, या निर्णयामुळे पालिकेच्या तिजोरीत महसुलाची भर पडणार असून मुंबईकरांना मोकळ्या हवेमध्ये पाटर्य़ा साजऱ्या करता येणार आहेत.

मुंबईमधील निवासी इमारतींच्या गच्चीवर उद्यान साकारण्यास विकास नियंत्रण नियमावलीमध्ये परवानगी देण्यात आली आहे. विकास करताना भूखंडाचे क्षेत्रफळ लक्षात घेऊन मोकळी जागा सोडावी लागणार आहे. त्याव्यतिरिक्त गच्चीवर उभारता येणार आहे. गच्चीवर साकारण्यात येणाऱ्या उद्यानाचा वापर सर्व रहिवाशांना करण्यास द्यावा अशी अट घालण्यात आली आहे. निवासी आणि व्यावसायिक इमारतींच्या संयुक्त गच्चीचा वाढीव भाग १.२० मीटर असावा अशी तरतूद नियमावलीत करण्यात आली असून इमारतीच्या गच्चीचे पोटभाग म्हणून विभाजन करता येणार नाही. त्याचा वापर लिफ्ट अथवा जिन्यासाठी करता येईल, असेही विकास नियंत्रण नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे.

‘रात्र जीवना’ला चालना

मुंबईमधील हॉटेल्ससह जीवनावश्यक वस्तूंची दुकाने रात्रभर सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली होती. त्याचाच एक भाग म्हणून गच्चीवरील हॉटेलला परवानगी द्यावी अशी संकल्पना आदित्य ठाकरे यांनी मांडली होती. पालिका प्रशासनाने विकास नियंत्रण नियमावलीमध्ये गच्चीवरील हॉटेलचा समावेश करून शिवसेनेच्या या मागणीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या ‘रात्र जीवना’ला चालना मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.