समाजमाध्यमांवर ठरावीक नावांच्या ‘तरुणीं’ची दहशत ; बनावट खाती उघडून वापरकर्त्यांची फसवणूक; मैत्रीच्या बहाण्याने फसवून खंडणी वसूलण्याचे प्रकार

समाजात बदनामी होण्याच्या भीतीने वा लाजेने तक्रारदार पुढे येत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

|| अनिश पाटील

मुंबई : कविता शर्मा, प्रियांका वर्मा… अशा सर्वसामान्य नावांनिशी बनवलेल्या बनावट प्रोफाइलद्वारे सामान्य वापरकर्त्यांशी मैत्री करून व नंतर त्यांना फसवून खंडणी वसूल करण्याचे प्रकार सध्या फेसबुकसह अन्य समाजमाध्यमांवर वाढू लागले आहेत. गावदेवी परिसरात एका डेटिंग अ‍ॅपवर अशाच नावाच्या तरुणीशी मैत्री करणाऱ्या तरुणाचे नग्नावस्थेतील चित्रीकरण करून त्याच्याकडे खंडणी मागितल्याची घटना नुकतीच उघड झाली.

या तरुणाप्रमाणेच अनेक वापरकर्ते आकर्षक प्रोफाइल छायाचित्र वापरणाऱ्या बनावट खात्यांच्या जाळ्यात अडकत आहेत. मात्र, समाजात बदनामी होण्याच्या भीतीने वा लाजेने तक्रारदार पुढे येत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

अल्टामाउंट रोड परिसरात राहणाऱ्या २६ वर्षीय तरुणाला एका ऑनलाइन डेटिंग अ‍ॅपवर ३ नोव्हेबर रोजी रात्री ८ च्या सुमारास सोनाली गुप्ता या नावाने मैत्रीचा प्रस्ताव आला होता. ती मान्य केल्यावर दोघांमध्ये संवाद सुरू झाला. दोघांनी परस्परांच्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकांची देवाणघेवाण केली. त्यानंतर सोनाली नावाच्या कथित तरुणीने कविता शर्मा नावाने त्याला फेसबुकवरून मैत्रीचा प्रस्ताव पाठवला. तसेच या तरुणाला सोनालीने व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावरून व्हीडिओ कॉल केला. त्यात एक महिला नग्नावस्थेत दिसून आली. संवाद करणाऱ्या भामट्यांनी तरुणालाही त्याचे     नग्नावस्थेतील चित्रीकरण पाठवण्याची विनंती केली. लैंगिक हव्यासापोटी तरुणानेही तसे चित्रीकरण करून कथित सोनालीला पाठवले. मात्र, त्यानंतर संवाद साधणाऱ्या भामट्यांनी तरुणाचे व त्या महिलेचे चित्रीकरण एकत्रित करून तरुणाला पाठवले. ही चित्रफित समाजमाध्यमावरून प्रसारित करण्याची धमकी देत तरुणाकडे पाच हजार रुपयांची मागणी करण्यात आली. तरुणाने घाबरून पैसे पाठवले. त्यानंतर आणखी एकदा १७ हजार रुपयांची भामट्यांची मागणीही त्याने पूर्ण केली. परंतु, खंडणीची मागणी सुरूच राहिल्याने त्याने पैसे देण्यास नकार देताच ती चित्रफित तरुणाची आई, बहीण आणि भावाच्या फेसबुक खात्यावर पाठवण्यात आली. या प्रकारामुळे व्यथित झालेल्या तरुणाने गावदेवी पोलिसांकडे तक्रार केली.

कविता शर्मा, प्रियांका वर्मा, सोनाली गुप्ता अशा सामान्य आणि प्रचलित वाटणाऱ्या नावांनिशी तरुणींची बनावट खाती तयार करून मैत्रीच्या ‘रिक्वेस्ट’ पाठवण्याचे प्रकार वाढल्याचे पोलिसांनीही मान्य केले. त्यामुळे अनोळखी व्यक्तीशी समाजमाध्यमावर खातरजमा न करता मैत्री करू नका आणि त्यांच्या मोहात बळी पडू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लाजेपोटी तक्रारीस टाळाटाळ

समाजमाध्यमांवरून प्रेमसंबंध वा शारीरिक सुखाचे आमिष दाखवून वापरकर्त्यांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले असल्याचे पोलीसही मान्य करतात. मात्र, अशी फसवणूक झालेले वापरकर्ते समाजात जाहीर बदनामी होण्याच्या भीतीने तक्रारीसाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे कठीण होते, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. गेल्या वर्षी १०० नागरिकांची अशाच प्रकारे आर्थिक फसवणूक झाल्याचे तपासात पुढे आले. परंतु, यापैकी केवळ एकानेच पोलिसांकडे अधिकृत तक्रार दिली होती.

इन्स्टाग्रामवरूनही खंडणीखोरी

इस्टाग्रामवर झालेल्या मैत्रीनंतर तरुणाने १६ वर्षीय मुलीचे अश्लील व्हिडिओ तिच्या कुटुंबीयांनाच पाठवून धमकावल्याचा गंभीर प्रकार उत्तर मुंबईत घडला आहे. इन्स्टाग्रामवर १६ वर्षीय मुलीची एका तरुणासोबत मैत्री झाली होती. मैत्रीनंतर या मुलीला राष्ट्रीय उद्यानात भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर मैत्री आणि प्रेमाचे आमिष दाखवून तिची आक्षेपार्ह अवस्थेतील चित्रफीत तयार केली. या चित्रफितीच्या आधारे तो तिला धमकावत होता. हे चित्रीकरण त्याने पीडित मुलीच्या कुटुंबीयांनाही पाठवले. सगळ प्रकार लक्षात आल्यानंतर मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार केली. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Terror of young women with certain names on social media fraud of users by opening fake accounts akp

ताज्या बातम्या