एस जनुकीय चाचण्यांच्या संच खरेदीसाठी लवकरच निविदा; केईएम आणि कस्तुरबामध्ये प्रत्येकी सुमारे आठशे संच उपलब्ध
मुंबई : मुंबईतील कस्तुरबा आणि केईएम रुग्णालयात सुरू केलेल्या एस जनुकीय आरटीपीसीआर चाचण्यांचे संच खरेदी करण्यासाठी लवकरच निविदा काढल्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यापूर्वी पालिकेने या दोन्ही रुग्णालयांसाठी प्रत्येकी तीन लाख रुपयांचे संच खरेदी केले आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, ओमायक्रॉनची बाधा झालेल्या व्यक्तीच्या नमुन्यात आरटीपीसीआर चाचणीमध्ये एस हा जनुकीय घटक अस्तित्त्वात नसल्याचे बहुतांश प्रयोगशाळांच्या अहवालात निर्दशनास आले आहे. त्यामुळे हा जनुकीय घटक आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये उपलब्ध नसल्यास शक्यतो ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाली आहे, असे सूत्र प्राथमिक पडताळणीसाठी वापरता येईल. परंतु अंतिम निर्णयासाठी जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सिक्वेिन्सग) चाचण्या करणे आवश्यक आहे. यानुसार पालिकेने केईएम आणि कस्तुरबा प्रयोगशाळेमध्ये बाधित प्रवाशांमध्ये ओमायक्रॉनमुळे बाधा झाली आहे का याची वेगाने पडताळणी करण्यासाठी एस जनुकीय आरटीपीसीआरच्या चाचण्या सुरू केल्या आहेत. करोना विषाणूच्या निदानासाठी केल्या जाणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीमध्ये एस, एन, ई आणि ओआरएफ हे जनुकीय घटक असतात. सर्वसाधारणपणे यातील कोणत्याही दोन जनुकीय घटकांचा वापर केलेल्या संचाचा वापर सध्या केल्या जातो. आपल्याकडे वापरल्या जाणाऱ्या बहुतांश चाचण्या संचामध्ये एस या जनुकीय घटकाचा वापर केलेला नाही. त्यामुळे यासाठी एस जनुकीय घटकाचा वापर केलेले संच वापरावे लागतात. पालिकेने सुरुवातीला तातडीने या चाचण्या सुरू करण्यासाठी केईएम आणि कस्तुरबा रुग्णालयांसाठी प्रत्येकी तीन लाख रुपयांचे संच खरेदी केले होते.
सर्वसामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीच्या संचाची खरेदी किंमत सुमारे अडीचशे रुपये असते, परंतु या एस जनुकीय आरटीपीसीआर संच तुलनेने थोडे महाग असून याची खरेदी किंमत सुमारे साडेतीनशे ते चारशे रुपये आहे. पालिकेला आपत्कालीन स्थितीमध्ये तीन लाख रुपयांपर्यंतची खरेदी करण्याचे अधिकार आहेत. या अंतर्गत कस्तुरबा आणि केईएम रुग्णालयात सध्या सुमारे आठशे संच खरेदी केले आहेत. त्यामुळे आता पुढील संच खरेदीसाठी लवकरच निविदा काढण्यात येणार आहेत, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
एस जनुकीय आरटीपीसीआर चाचणी ही खात्रीशीर नसल्यामुळे यानंतर या प्रवाशांची जनुकीय चाचणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व बाधित प्रवाशांचे नमुने जनुकीय चाचण्यांसाठी पाठविले जात आहेत.
सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका