scorecardresearch

‘एआरटी केंद्रा’त मधुमेह, रक्तदाबाच्याही चाचण्या

एचआयव्हीबाधित ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा देण्याचा निर्णय

‘एआरटी केंद्रा’त मधुमेह, रक्तदाबाच्याही चाचण्या

एचआयव्हीबाधित ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा देण्याचा निर्णय

शैलजा तिवले, लोकसत्ता

मुंबई: एचआयव्हीबाधितांना सुरू असलेल्या औषधांमुळे अन्य असंसर्गजन्य आजाराचा धोका अधिक असल्यामुळे याचे वेळीच निदान आणि उपचार होण्यासाठी आता एआरटी (एन्टीरेट्रोव्हायरल थेरपी) केंद्रामध्ये ६० वर्षांवरील रुग्णांच्या मधुमेह आणि रक्तदाबाच्या चाचण्या १ ऑक्टोबर या आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनापासून सुरू होणार आहेत.

जगभरात झालेल्या अभ्यासानुसार एचआयव्ही बाधितांना उपचारासाठी दिल्या जाणाऱ्या औषधांचा परिणाम शरीरावर होत असल्यामुळे या रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब होण्याचे प्रमाण जास्त आहे. परंतु ज्या एआरटी केंद्रामध्ये हे रुग्ण उपचार घेत असतात, तिथे केवळ एचआयव्हीच्या उपचारांवर लक्ष दिले जाते. त्यामुळे रुग्णाला मधुमेह किंवा उच्च रक्तदाब आहे का याच्या चाचण्या केल्या जात नाहीत. तसेच ज्या रुग्णांना असे आजार असतात ते रुग्ण अन्य डॉक्टरांकडे यासाठी उपचार घेत असतात. त्यामुळे या आजारांसाठी ते नक्की उपचार घेत आहेत का, याचा पाठपुरावाही केला जात नाही. तेव्हा एकाच ठिकाणी एचआयव्हीसह मधुमेह आणि उच्च रक्तदाब या आजारांचेही निदान आणि उपचार करण्याच्या उद्देशाने मुंबईतील प्रत्येक एआरटी केंद्रावर ६० वर्षांवरील रुग्णांच्या चाचण्या १ ऑक्टोबरपासून सुरू केल्या जाणार आहेत, असे मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण विभागाच्या अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. श्रीकला आचार्य यांनी सांगितले.

एकाच ठिकाणी नोंद आणि उपचार

एचआयव्हीसह अन्य असंसर्गजन्य आजारांची नोंदही एकाच ठिकाणी होत असल्यामुळे या रुग्णांवर असंसर्गजन्य आजारांचे होणारे प्रमाण यांचे निरीक्षण करणे सोपे होईल. तसेच या रुग्णांना आधीच अनेक औषधे सुरू असल्यामुळे दोन विविध आजारांची औषधे एकमेकांना बाधक होणार नाहीत किंवा औषधांची संख्या कमी कशी करता येईल याकडेही लक्ष दिले जाईल. याचा फायदा रुग्णांना नक्की होईल, असे मत डॉ. आचार्य यांनी व्यक्त केले.

आवश्यक यंत्रे उपलब्ध

* मुंबईत एचआयव्हीबाधितांना उपचार देणारी २० एआरटी केंद्र आहेत. या प्रत्येक केंद्रामध्ये मधुमेह आणि रक्तदाबाच्या चाचण्यांसाठी आवश्यक यंत्रे उपलब्ध केली आहेत.

* या रुग्णांना मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाचे निदान झाल्यास उपचार कसे करावेत यासाठी मार्गदर्शकतत्त्वेदेखील तयार केली आहेत.

* पालिका आणि शासकीय रुग्णालयांमध्ये एचआयव्ही बाधितांसह मधुमेह, रक्तदाबाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांची समिती तयार केली असून या समितीने ही मार्गदर्शकतत्त्वे तयार केली आहेत.

* एआरटी केंद्रांना रुग्णांच्या उपचारामध्ये काही अडचण आल्यास या समितीतील डॉक्टरांची मदत घेतली जाईल किंवा या अन्य आजारांची तीव्रता वाढल्यास जवळील पालिका रुग्णालयात उपचारासाठी पाठविले जाणार आहे. मुंबईतील २० एआरटी केंद्रावर १८ वर्षांवरील ३५,०७१ तर ४५ वर्षांवरील १७,०५१ रुग्ण उपचार घेत आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tests for diabetes and blood pressure for senior citizens in art center zws

ताज्या बातम्या