मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २३ नोव्हेंबर २०२५ रोजी घेतलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) निकाल लवकरच जाहीर होणार आहे. मात्र या परीक्षेतील पेपर क्रमांक १ मधील प्रश्न चुकीचा असल्याने रद्द करण्यात आला असल्याचे राज्य परीक्षा परिषदेतर्फे जाहीर करण्यात आले आहे. तसेच चुकीच्या प्रश्नांचा फटका थेट गुणांवर बसत असल्याने रद्द करण्यात येणाऱ्या प्रश्नांचे गुण हे सर्वांना द्यावेत, अशी मागणी परीक्षार्थींकडून जोर धरू लागली आहे. याबाबत अनेक परीक्षार्थींनी राज्य परीक्षा परिषदेकडे सविस्तर लेखी अर्ज केला आहे.

परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २३ नोव्हेंबर रोजी विविध जिल्ह्यात टीईटी घेण्यात आली. इयत्ता पहिली ते पाचवीसाठी पेपर क्रमांक एक व सहावी ते आठवीसाठी पेपर क्रमांक दोन घेण्यात आला होता. या दोन्ही परीक्षांचा अंतरिम निकाल १६ जानेवारी २०२६ रोजी परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला.

अंतरिम निकालावर परीक्षार्थींकडून १६ ते २१ जानेवारीपर्यंत गुण पडताळणी व आक्षेप मागविण्यात आले होते. त्यानुसार परीक्षार्थींकडून नोंदविण्यात आलेल्या हरकतीनुसार पेपर क्रमांक १ मधील परिसर अभ्यास विषयातील प्रश्न क्रमांक संच ए मधील १४७, संच बी मधील १४२, संच सी मधील १३७ आणि संच डी मधील १३२ याबाबत आक्षेप नोंदविण्यात आले. या आक्षेपावर तज्ज्ञ व समीक्षकांच्या अभिप्राय मागविण्यात आले. तज्ज्ञ व्यक्तींकडून आलेल्या अभिप्रायानुसार हा प्रश्न रद्द करण्याचा निर्णय परिषदेकडून घेण्यात आला. तसेच हा प्रश्न रद्द करून त्यानुसारच अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या टीईटीला बसणाऱ्या परीक्षार्थींच्या संख्येत यंदा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून ४ लाख ७५ हजार ६६८ उमेदवारांनी नोंदणी केली होती. राज्यातील १ हजार ४२० परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. परीक्षेची उत्तरसूची जाहीर करण्यात आली. त्यानंतर उमेदवारांना त्यांच्या लॉगिनमध्ये अंतरिम निकाल पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला.

दरम्यान, प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न चुकीचे आहेत तर काही संदिग्ध असल्याचे आक्षेप परीक्षार्थींनी नोंदवले होते. प्रश्नांत चूक असल्यात त्यामध्ये परीक्षार्थींची कोणतीही चूक नसते. परीक्षेतील त्रुटी असलेले प्रश्न रद्द करण्यात आल्यास १५० प्रश्नांमधून ते प्रश्न वजा होतात. त्यामुळे कमी प्रश्नांमध्ये ६० टक्के गुण मिळवावे लागतात. त्यामुळे पात्रतेसाठी आवश्यक गुणांचे प्रमाण तुलनेने अधिक होते.

तसेच सर्वोच्च न्यायालयाने ठरावीक कालावधीत टीईटी उत्तीर्ण होण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे परीक्षेमध्ये त्रुटीयुक्त प्रश्न असतील तर राज्य मंडळाच्या परीक्षांप्रमाणे सर्वच पर्याय ग्राह्य धरून त्या प्रश्नांचे गुण परीक्षार्थींना देण्यात यावेत, अशी मागणी परीक्षार्थींकडून राज्य मंडळाकडे करण्यात आली आहे.