मुंबई : हिंदी सक्तीच्या विरोधात पाच जुलै रोजी निघणाऱ्या मोर्च्या ऐवजी वरळी डोम सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ढोल, ताशे, लेझीम, दहीहंडीचे थर, ब्रास बॅन्ड पथक, आणि ‘सुरु झाले नवीन पर्व मराठीचा आम्हास गर्व’ सारख्या घोषवाक्याचे फलक अशा मराठमोळ्या वातावरणात ‘ठाकरे’ बंधूंच्या ‘आवाज मराठीचा’ नेत्रदिपक कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाला आलेल्या उपस्थितांनी डावे उजवे न करता दोन्ही ठाकरे यांच्या आगमनापासून ते प्रस्थानापर्यंत सारखाच प्रतिसाद दिला.
पावसाळ्याचे दिवस असल्याने हा मेळावा वरळी येथील राष्ट्रीय क्रीडा संकुल (वरळी डोम) सारख्या बंदीस्त सभागृहात घेण्यात आला. सभागृहाची प्रेक्षक क्षमता आठ हजार असली तरी सभागृह खचाखच भरले होते. . मेळाव्यासाठी सकाळी आठ वाजल्यापासून सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि मराठी माणसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली. दोन्ही पक्षातील कार्यर्त्यांच्या मनोमिलनाचे साक्षीदार होण्यासाठी हजर होते.
वरळी डोमच्या प्रवेशद्वाराजवळ ढोल, ताशे, लेझिमने ताल धरला होता. जय जवान गोविंद पथकाने दहीहंडी पूर्वीच दहीहंडीचे थर रचून निमंत्रितांना सलामी दिली. ‘आम्ही सारे भाऊ भाऊ मराठीचा गौरव गाऊ’, ‘सुरु झाले नवीन पर्व मराठीचा आम्हाला गर्व’ सांगणारी घोषवाक्य फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. ‘लाभेल आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी’ वाक्याने सर्वांचे स्वागत केले गेले. सभागृहात वरळीच्या ‘आस्तिक ब्रास बॅन्ड’ पथकाने सर्वांची मने जिंकून घेतली. ‘जय जय महाराष्ट्र पासून ते ये गो दांडयावरी’ पर्यंतच्या गाण्यांवर उपस्थितांनी चांगलाच ठेका धरला. बसलेल्या खूर्चीवर उभे राहून नृत्य करण्याचा मोह अनेक महिलांना आवरता आला नाही.
व्यासपीठावर आगळेवेगळे आगमन
उध्दव ठाकरे व राज ठाकरे यांचे व्यासपीठावरील आगमन एखाद्या चित्रपटाच्या प्रीमियर शो ला साजेसे होते. व्यासपीठावरील उजव्या व डाव्या बाजूच्या विंग मधून एकाच वेळी दोन ठाकरे यांचा प्रवेश झाला. त्यावेळी सभागृहातील झगमगणारे दिवे काही क्षणासाठी बंद करण्यात आले. उपस्थित लोकांनी उत्सफूर्तेपणे तात्काळ मोबाईलचे दिवे (टाॅर्च) लावले. हा प्रसंग नेत्रदिपक होता. एकाचवेळी सभागृहात हजारो लुकलुकणार दिव्यांचा काजव्याप्रमाणे झगमगाट झाला आणि दोन ठाकरेंनी व्यासपीठावर प्रवेश केला. त्यावेळी उपस्थितांनी एकच जल्लोष केला. टाळ्या, शिटया, घोषणा, चित्कार यांचा पाऊस सभागृहात पडला.
उध्दव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना येऊन मिठी मारली. राज ठाकरे यांनी मात्र जागेवरुन हलण्याची फारशी तसदी घेतली नाही. छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याला दोन्ही भावांनी एकाच वेळी पुष्पहार अर्पण केले. महापुरुषांच्या प्रतिमेला नमस्कार करण्याचे सौजन्य उध्दव ठाकरे यांनी दाखविले. उध्दव ठाकरे यांनी साधा राखाडी रंगाचा कुर्ता घातला होता तर राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे पाढऱ्या रंगाचा कुर्तावर निळ्या रंगाचा मफलर (स्टोल) घेतला होता. त्यांनी घातलेली लाल रंगाची मोजडी मात्र सर्वांचे लक्ष वेधणारी होती.
दोन्ही भावांच्या भाषणाला मराठी श्रोत्याने सारखाच प्रतिसाद दिला. भाषणाची अमोघ वाणी लाभलेल्या राज ठाकरे यांना मात्र काकणभर जास्तच प्रतिसाद मिळाला. सरतेशेवटी दोन भावांचे, दोन भावजयांचे, दोन चुलत भावांचे फोटोसेशन झाले. व्यासपीठावर फक्त दोन ठाकरे होते. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, रासपचे महादेव जानकर, शेकापचे जंयत पाटील, काँग्रेसचे भालचंद्र मुणगेकर, भाकपचे प्रकाश रेड्डी, माकपचे डाॅ. अजित नवले, मराठी भाषा अभ्यासक दीपक पवार, अभिनेत्री, तेजस्विनी पंडीत, अभिनेता भरत जाधव, सिध्दार्थ जाधव उपस्थित होते.