पंजाबमध्ये अमृतपाल सिंग याच्या विरोधातील कारवाईचे पडसाद देशभरासह विदेशातही उमटताना दिसून येत आहेत. दोन दिवसांपूर्वीच भारतीय उच्चायुक्त कार्यालयाबाहेर खलिस्तानी समर्थकांनी भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचंही समोर आलं होतं. दरम्यान, यावरून ठाकरे गटाने मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. भारताला ५६ इंच छाती असलेले पंतप्रधान लाभले असताना तिरंगा उतरविण्याची अतिरेक्यांची हिंमत होतेच कशी? अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.
ठाकरे गटाने नेमकं काय म्हटलंय?
“पंतप्रधान मोदी हे अंध भक्तांचे विश्वगुरू आहेत, त्याविषयी आम्हाला काहीच बोलायचे नाही, पण आपल्या देशाच्या राष्ट्रीय भावना जगभरात तुडवल्या जात आहेत त्या अंध भक्तांना अजिबात दिसत नाहीत. खलिस्तान चळवळीचा नवा ‘भिंद्रनवाले’ अमृतपाल सिंग याच्या विरोधात पंजाबात कारवाई सुरू होताच त्याचे पडसाद लंडनमध्ये उमटले. लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर खलिस्तानी समर्थकांनी हल्ला केला व फडकणारा तिरंगा खाली उतरवला. भारताला ५६ इंच छाती असलेले पंतप्रधान लाभले असताना आपला तिरंगा अशा प्रकारे उतरविण्याची अतिरेक्यांची हिंमत व्हावी हे धक्कादायक आहे”, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाने दिली आहे.
“…मग हा देशाचा अपमान नाही काय?”
पुढे बोलताना त्यांनी राहुल गांधीच्या भाषणावर होत असलेल्या टीकेवरून भाजपालाही लक्ष्य केलं. “सध्या आपल्या देशात एक वाद घोंघावतो आहे. त्या वादाचा केंद्रबिंदू राहुल गांधी यांनी लंडन येथे केलेले भाषण आहे. भारतातील लोकशाही धोक्यात आहे, असे गांधी लंडन येथे म्हणाले. हा देशद्रोह आहे, असे भाजपवाले म्हणत आहेत. मग त्याच लंडनमध्ये भारतीय उच्चायुक्त कार्यालयात घुसून खलिस्तानवाद्यांनी तिरंगा उतरवला, धुडगूस घातला हा देशाचा अपमान नाही काय? फक्त निषेध, धिक्कार करण्याशिवाय तुम्ही काय केलेत?”, असा प्रश्न त्यांनी विचारला.
हेही वाचा – ‘एकनाथ शिंदेंनीच कुख्यात बुकी अनिल जयसिंघानीला मातोश्रीवर पाठवलं’; विनायक राऊतांचं थेट विधान, म्हणाले…
“हे देशाच्या स्थिरतेसाठी चांगले लक्षण नाही”
“देशातील लोकशाही व स्वातंत्र्य धोक्यात असून आपल्या तिरंग्याचे रक्षण करायला सरकार म्हणून तुम्ही तोकडे पडला आहात. इंग्लंडचा युनियन जॅक उतरवून तिरंगा फडकविण्यासाठी लाखो लोकांनी त्याग केला. त्या त्यागात कोणतेही योगदान नसलेल्या लोकांच्या हाती सत्ता गेल्याचा हा परिणाम आहे. खलिस्तान चळवळीचे भूत पुन्हा डोके वर काढते आहे व शीख तरुणांची डोकी भडकवली जात आहेत. हे देशाच्या स्थिरतेसाठी चांगले लक्षण नाही”, अशी टीकाही त्यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर केली.
हेही वाचा – “देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या नेत्याने ‘या’ प्रकरणावरून दिला इशारा
“अमृतपाल सिंग आयएसआयचा हस्तक”
“पंजाबात अशांतता राहावी म्हणून पाकिस्तानच्या हालचाली सुरू असतात. कश्मीरप्रमाणेच पंजाब जरा जास्तच स्फोटक व संवेदनशील आहे, पण कश्मीरच्या बाबतीत जे ‘सर्जिकल स्ट्राइक’ राजकारण केले जाते, ते पंजाबच्या बाबतीत होत नाही. कारण येथे भाजपाला हिंदू-मुसलमान हा राजकीय वाद निर्माण करता येत नाही. आज पंजाब पुन्हा एकदा अशांत होत आहे व त्यामागे पाकिस्तान आणि चीनचा हात आहे. अमृतपाल सिंग हा पाकिस्तानी आयएसआयचा हस्तक म्हणून काम करत आहे”, असेही ते म्हणाले.