गौतम अदाणी प्रकरणावरून काँग्रेससह विरोधकांकडून भाजपाला घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेसने या प्रकरणी संयुक्त संसदीय समितीमार्फत (जेपीसी) चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी या चौकशीला घाबरत असल्याचा आरोपही विरोधकांकडून करण्यात येत आहे. अशात दोन दिवसांपूर्वी एका सभेत बोलताना, अदाणी यांच्या विरोधात पुरावे असतील तर विरोधकांनी न्यायालयात जावे, असे विधान केंद्रीय गृहमंत्र अमित शाह यांनी केले. दरम्यान, यावरून आता ठाकरे गटाने मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. देशात लोकशाहीच्या नावाने ‘धमकी राज’ सुरू झाले असून वैफल्यावस्थेचे हे शेवटचे लक्षण असावे, अशी टीका ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – शिवसेना सोडण्याआधी राज ठाकरेंनी काय मागितलं होतं? मी साक्षीदार आहे म्हणत एकनाथ शिंदेंचं विधान!

ठाकरे गटाने काय म्हटलंय?

“देशाचे विद्वान गृहमंत्री अमित शहा यांनी वादग्रस्त उद्योगपती गौतम अदाणींवर अखेर तोंड उघडले आहे. अदाणी यांच्या संदर्भात कोणाकडे काही पुरावे असतील, तर त्यांनी न्यायालयात जावे, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. उगाच विनाकारण आरोप करून काय उपयोग? असे सांगत केंद्रीय गृहमंत्र्यांनी देशातल्या सर्वात मोठ्या भ्रष्टाचारास एक प्रकारे कवचकुंडलेच प्रदान केली”, अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.

“केंद्र सरकारच्या मेंदूचा केमिकल लोचा झालाय”

“अमित शाह यांनी आणखी एक मजेशीर विधान केले. सीबीआय, ईडीसारख्या संस्थांचे काम अत्यंत निष्पक्ष पद्धतीने काम करतात असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानापुढे सर्व कॉमेडी शो फिके पडतील, असे हे विधान आहे. शाह यांची ही विधानं म्हणजे केंद्र सरकारच्या मेंदूचा एक प्रकारे जो केमिकल लोचा झाला आहे, त्याचा पुरावा आहे, असेही ते म्हणाले. तसेच अदाणी यांच्या विरोधात कोर्टात जा, असे गृहमंत्री अमित शाह सांगतात. मग यावेळी ईडी वगैरे निष्पक्ष संस्था काय करत आहेत?” असा प्रश्नही त्यांनी विचारला.

“…ते सगळेच लोकशाही व स्वातंत्र्याचे विरोधक आहेत”

यावेळी ठाकरे गटाने किरण रिजिजू यांच्या न्यायाधीशांबाबत केलेल्या विधानावरूनही मोदी सरकारला लक्ष्य केलं. “किरण रिजिजू हे न्यायव्यवस्थेविरुद्ध बेबंदपणे बोलत आहेत. ‘काही निवृत्त न्यायाधीश भारतविरोधी टोळीत आहेत. हे निवृत्त न्यायमूर्ती न्यायपालिकेला सरकारविरुद्ध उभे करण्यासाठी प्रयत्नशील असून त्यांना त्याची मोठी किंमत मोजावी लागेल,’ अशी धमकीची भाषा न्यायमूर्तींच्या बाबतीत देशाच्या कायदामंत्र्यांनी करावी हे भारतीय लोकशाहीचे दुर्दैव आहे. मुळात देशविरोधी टोळी म्हणजे काय व त्यात कोण सामील झाले? सरकारी निर्णयाविरुद्ध मत व्यक्त करणे हे ज्यांना देशद्रोही कृत्य वाटू लागते, ते सगळेच लोकशाही व स्वातंत्र्याचे विरोधक आहेत. त्यामुळे देशाचे गृहमंत्री व कायदामंत्री ‘लोकशाही’, ‘स्वातंत्र्य’, ‘तटस्थता’ वगैरे शब्दांचा वापर करून जो गोंधळ घालीत आहेत तो पटणारा नाही”, अशी टीका त्यांनी केली.

हेही वाचा – “उद्धव ठाकरेंच्या डोक्यात काँग्रेस-राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपदाचा बल्ब पेटवला आणि…” एकनाथ शिंदेंचा आरोप

“निवडणूक आयोग सरकार बनवून देणारा कंत्राटदार”

“निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी समिती स्थापन करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनाही कायदामंत्री रिजिजू यांनी विरोध दर्शविला. त्यात आश्चर्य वाटावे असे काहीच नाही. निवडणूक आयोग हा भाजपाचा घरगडी असल्याप्रमाणेच वागत आहे. भारतीय जनता पक्षाच्या विजयात निवडणूक आयोगाचे मोठेच योगदान आहे, हे आता उघड झाले आहे. जगातील सर्व देशांनी ‘ईव्हीएम’द्वारे मतदान बंद केले. कारण त्यात घोटाळे होत आहेत, पण फक्त भारतात ‘ईव्हीएम’ सुरू आहे. कारण भाजपास घोटाळा केल्याशिवाय जिंकता येत नाही. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून पक्ष फोडले गेले. सरकारे पाडून त्यांना हवी तशी सरकारे बनवून देणारा कंत्राटदार म्हणून निवडणूक आयोग सध्या भाजपच्या मांडलिकाची भूमिका बजावत आहे. त्यावरच सर्वोच्च न्यायालयाने हातोडा मारल्याने कायदामंत्र्यांनी निषेध व्यक्त केला”, असेही ते म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thackeray group criticized modi government after amit shaha statement on adani case spb
First published on: 20-03-2023 at 07:51 IST