मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला जोर चढला असून मुंबईतील २२७ पैकी ११ प्रभागात सरळ लढत होत आहे. या प्रभागात दोनच उमेदवार समोरा समोर असल्याने येथील निवडणूक लक्षवेधी ठरली आहे. ११ पैकी ३ प्रभागात शिवसेनेच्या ठाकरे गट विरद्ध शिंदे गट अशी चुरस होत आहे. तर अन्य तीन ठिकाणी ठाकरे गट आणि भाजप आमने -सामने आहे.
मुंबई महापालिका निवडणूक आखाडयात भाजप-शिवसेना -रिपब्लिकन आठवले गट यांची महायुती, शिवसेना ठाकरे गट- महाराष्ट्र नवनिर्माण सेना- राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस-वंचित बहुजन या तीन प्रमुख आघाड्या एकमेकांच्या समोर उभ्या ठाकल्या आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, समाजवादी पक्ष, एमआयएम हे पक्ष स्वबळावर निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे काही ठिकाणी तिरंगी, चौरंगी आणि पंचरंगी लढती होत आहेत.
प्रभाग क्रमांक १९१ मध्ये शिंदे गटाचे माजी आमदार सदा सरवणकर यांची कन्या प्रिया सरवणकर आणि ठाकरे गटाच्या विशाखा राऊत यांच्यात जोरदार लढत होत आहे. प्रिया या पहिल्यांदा निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. तर माजी आमदार असलेल्या राऊत या अनुभवी उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक १९८ मध्ये शिंदे गटाच्या वंदना गवळी आणि ठाकरे गटाच्या अबोली खाडे एकमेकांच्या समोर उभ्या आहेत. प्रभाग क्रमांक ६ मध्ये शिंदे गटाच्या दिशा कारकर विरुद्ध ठाकरे गटाच्या संजना वेंगुर्लेकर असा सामना आहे.
प्रभाग क्रमांक ११ मध्ये शिंदे गटाच्या आदिती खुरसुंगे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कविता माने यांनी आव्हान दिले आहे. प्रभाग क्रमांक १३ मध्ये भाजपच्या राणी द्विवेदी आणि शिवसेना ठाकरे गटाच्या आसावरी पाटील अशी लढत होत आहे. प्रभाग क्रमांक ५ मध्ये भाजपच्या जिग्ना शहा यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या जयश्री एडविन प्रवीण उभ्या आहेत. प्रभाग क्रमांक १८मध्ये शिंदे गटाच्या संध्या दोषी साक्रे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदिच्छा मोरे यांनी आव्हान दिले आहे. प्रभाग क्रमांक १९ मध्ये भाजपच्या दक्षता कवठणकर आणि ठाकरे गटाच्या लीना गुढेकर यांच्यात तर प्रभाग क्रमांक ४६ मध्ये भाजपच्या योगिता कोळी विरुद्ध मनसेच्या स्नेहिता डेहलकर अशी चुरशीची लढत होत आहे.
