मुंबई – हिंदी सक्तीच्या विरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आल्यामुळे दोघांच्याही कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. पालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर हे दोन बंधू एकत्र आल्यामुळे पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांबरोबरच इच्छुक उमेदवारांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. मात्र शिवसेना (ठाकरे) आणि मनसे यांचे मतदारसंघ सारखेच असल्यामुळे पालिकेच्या निवडणूकीच्यावेळी मतांचे एकत्रिकरण होईल पण काही जागा मनसेसाठी सोडाव्या लागतील याचीही आता चर्चा होऊ लागली आहे.
गेल्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येणार का याचे तर्कवितर्क लावले जात होते. शनिवारच्या विजयी मेळाव्यानंतर या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मात्र आता नव्या शक्यतांवर चर्चा रंगू लागली आहे. या दोन्ही पक्षांचे बालेकिल्ले एकच आहेत त्यामुळे निवडणूकीला हे दोन्ही पक्ष एकत्रितपणे सामोरे जातील का याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. मात्र या दोन भावांनी एकत्र यावे ही कार्यकर्त्यांचीच इच्छा होती. त्यामुळे त्यातून काहीतरी मार्ग निघेल अशी आशा कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
२०१७ च्या पालिका निवडणूकीत मनसेचे केवळ सात नगरसेवक निवडून आले होते. तर २०१२ च्या निवडणूकीत तब्बल २८ जागा मनसेने मिळवल्या होत्या. त्यामुळे मुंबईतील या २८ प्रभागांमध्ये मनसेचे आजही मतदार आहेत. त्यामुळे मनसेच्या इच्छुक उमेदवारांचेही यंदाच्या पालिका निवडणूकीकडे लक्ष लागले होते. दोन बंधू एकत्र आले तरच निवडणूक लढवायची असाही निर्धार अनेकांनी केला आहे.
मतांची विभागणी झाल्यामुळे होणारे नुकसान परवडणारे लक्षात आल्यामुळे आता दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना आता ठाकरे बंधू एकत्र आल्यास फायदा होईल असा विश्वास वाटतो. शिवडी, परळ, विशेषत: दादर, माहीम हे या दोन पक्षांचे समान मतदारसंघ आहेत. या सगळ्या मतदार संघांवर सध्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा वरचष्मा असला तरी काही जागा मनसेसाठी सोडाव्या लागणार आहेत. इतर कोणाशीही युती आघाडी केली तरी जागा सोडाव्या लागतातच त्यामुळे मनसे आणि शिवसेनेने एकत्र येऊन निवडणूक लढवली तर मत विभाजनाचा फटका तरी बसणार नाही, असा विश्वास या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना वाटतो आहे.
येत्या पालिका निवडणूकीत मुख्य लढत ही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षात होण्याची शक्यता जास्त आहे. मात्र या लढतीत ठाकरे बंधू एकत्र आल्यास त्याचा फटका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसेल असा विश्वास ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांना वाटतो आहे. त्याकरीता त्यांना दोन भावांनी निवडणूकीसाठीही एकत्र यावे असे वाटते आहे.