मुंबई : शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात मुंबईबाहेरील सुमारे ४० टक्के थॅलेसेमियाचे रुग्ण नियमित रक्त घेण्यासाठी येत असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या रुग्णांचे विकेंद्रीकरण होणे गरजेचे असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.
लो. टिळक रुग्णालायात थॅलेसेमियाच्या ३१० रुग्णांची नोंद असून ते नियमित रक्त घेण्यासाठी येतात. या रुग्णांना दर १५ दिवसांनी रक्त द्यावे लागते. रुग्णांची संख्या वाढतच असून पनवेल, भिवंडी, ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासगनर अशा मुंबई महानगर प्रदेशातून रुग्ण येतात. रुग्णसंख्या वाढीमुळे रक्ताची मागणीही वाढत आहे. त्या तुलनेत रक्त उपलब्ध असल्यास अडचण येत नाही. परंतु एप्रिल, मे महिन्यात दात्यांची कमतरता असल्यामुळे या रुग्णांसाठी रक्त उपलब्ध करणे आव्हानात्मक असते, असे रुग्णालयातील बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. सुषमा शर्मा यांनी सांगितले.
दुसऱ्या दिवशी थॅलेसेमियाच्या कोणत्या बालकांना कोणत्या गटाचे रक्त हवे याची यादी आम्हाला आदल्या दिवशीच येते. त्यानुसार रक्ताचे नियोजनही केले जाते. रक्ताचा साठा कमी असल्यास आम्ही जवळच्या रक्तपेढीमधून ते उपलब्ध करून देतो. परंतु रक्ताचा साठा पुरेसा नसल्यास तसे थॅलेसेमिया केंद्राला कळविले जाते. अशा स्थितीत रुग्णाच्या हिमोग्लोबीनची तपासणी केली जाते. कमी हिमोग्लोबीन असलेल्या रुग्णांना प्राधान्याने रक्त दिले जाते. रुग्णांना रक्त मिळण्यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेने जोडून दिलेल्या खासगी रक्तपेढय़ांशीही वारंवार संपर्क साधला जातो. गेल्या महिन्यात या पेढय़ांनी ठरवून दिलेल्या साठय़ापैकी सुमारे ६६ टक्के रक्ताचा साठा उपलब्ध करून दिला आहे. परंतु कधीकधी रक्ताचा साठा उपलब्ध नसल्यास आमचाही नाईलाज होतो, असे रुग्णालयातील रक्तपेढीच्या प्रमुख डॉ. अंजली महाजन यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांमध्ये शहरासह मुंबई महानगर प्रदेशातही थॅलेसेमिया केंद्र सुरू झाली आहेत. रुग्णालयातील नोंदणी केलेल्या रुग्णांचे इतर केंद्रावर विकेंद्रीकरण झाल्यास रक्ताची गरज विभागाली जाईल आणि रुग्णांनाही रक्त उपलब्ध करणे सोयीचे होईल. शीव येथील के. जे. सोमय्या रुग्णालयातही नुकतेच थॅलेसेमिया केंद्र सुरू झाले आहे. तेथे आता काही रुग्णांना पाठविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे डॉ. सुषमा शर्मा यांनी सांगितले.
अन्य केंद्रांवर जाण्यास रुग्णांचा नकार
मुंबई बाहेरून येणाऱ्या रुग्णांना आम्ही त्यांच्या भागातील केद्रांमध्येच रक्त घेण्याची विनंती करतो. परंतु तेथे बऱ्याचदा सोयी-सुविधा उपलब्ध नसतात. दरवेळी रक्त मिळतेच याची शाश्वती नसते. रक्त उपलब्ध नसल्यास बाहेरून रक्त आणण्यास सांगितले जाते. त्यामुळे आम्ही तेथील केंद्रावर जात नाही, अशी तक्रारही काही रुग्ण करतात, असे येथील डॉक्टरांनी सांगितले. मुंबई बाहेरील केंद्रावर योग्य सुविधा उपलब्ध असल्यास रुग्णांचाही त्रास कमी होईल आम्हालाही रक्ताचे नियोजन करणे सोयीचे होईल, असेही डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.
१७ केंद्रे उपलब्ध
मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशामध्ये थॅलेसेमियाच्या रुग्णांसाठी १७ केंद्रे आहेत. मुंबईत यापैकी केईएम, नायर, वाडिया, लो. टिळक, कूपर, जे.जे. सेंट जॉर्ज, आयआरसीएस (फोर्ट) ही केंद्रे आहेत. अन्य केंद्रे ठाणे, दहिसर, उल्हासनगर, वाशी, नेरूळ, कामोठे, भिवंडी येथे आहेत.
..तर तुटवडा भासणार नाही
लो. टिळक रुग्णालयात दैनंदिन लहान-मोठय़ा अशा सुमारे साडेचारशेहून अधिक शस्त्रक्रिया दरदिवशी केल्या जातात. त्यामुळे रक्ताची मागणीही मोठय़ा प्रमाणात आहे. यातूनही थॅलेसेमियाच्या बालकांसाठी रुग्णालयात वर्षांनुवर्षे मोफत रक्त उपलब्ध केले जाते. परंतु ज्या तुलनेत रक्ताची मागणी आहे, त्या तुलनेत रुग्णालयात येणारे रुग्णांचे नातेवाईक रक्तदान करण्यास तयार नसतात. रक्तदान हे स्वेच्छेने करण्याचे दान आहे. त्यामुळे रुग्णालयातील बहुतांश रक्ताची गरज ही रक्तपेढीच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या शिबिरांद्वारेच भागविली जाते. नागरिक, रुग्णांच्या नातेवाईकांनीही रुग्णालयातून रक्त घेतल्यास त्या तुलनेत रक्त उपलब्ध करून देण्याची जबाबदारी उचलल्यास तुटवडा भासणार नाही, असे मत रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी व्यक्त केले.
मे महिन्यात शिबिरांचे आयोजन
रक्ताचा पुरेसा साठा उपलब्ध करण्यासाठी मे महिन्यात ठाणे, घाटकोपर, मालाड, दादर आदी विविध रेल्वे स्थानकांवर रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त दात्यांच्या सोयीसाठी रुग्णालयातील रक्तपेढी रक्तदान करण्यासाठी संध्याकाळी सातपर्यत खुली ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. महाजन यांनी दिली.