मुंबई : कर्करोगावरील औषधांच्या किमतींवर नियंत्रण आणण्याच्या धर्तीवर थॅलेसेमिया आणि सिकलसेल रुग्णांच्या उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांसह रक्तसंक्रमणासाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय साहित्याच्या किमतींवरही नियंत्रण आणावे, अशी मागणी एमएमसीचे माजी प्रशासक आणि थॅलेसेमिया अँड सिकल सेल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष, ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. विंकी रुघवानी यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. या आजारांवरील उपचार दीर्घकाळ, अनेकदा आयुष्यभर सुरू ठेवावे लागत असल्याने औषधे आणि वैद्यकीय साहित्याच्या वाढत्या खर्चाचा आर्थिक भार रुग्णांच्या कुटुंबांवर पडतो. त्यामुळे औषधांच्या कमाल किंमती निश्चित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.

भारतात सुमारे १४ लाख सिकलसेल रुग्ण आणि एक लाख ५० हजार थॅलेसेमिया मेजरचे रुग्ण आहेत. ही आकडेवारी अंदाजित असून प्रत्यक्ष रुग्णसंख्या अधिक असण्याची शक्यता आहे. थॅलेसेमिया आणि सिकलसेल हे गंभीर आजार असून, त्यांच्यावरील उपचारांमध्ये सातत्य राखणे आवश्यक असते. विशेषतः थॅलेसेमिया तीव्र असलेल्या अनेक बालकांना नियमित रक्तसंक्रमण करावे लागते. शरीरात वारंवार रक्तसंक्रमणामुळे अतिरिक्त लोह साचण्याची शक्यता असते. ते कमी करण्यासाठी औषधोपचारही आवश्यक असतात. याशिवाय रुग्णांच्या प्रकृतीनुसार नियमित वैद्यकीय तपासण्या आणि अन्य उपचार करावे लागतात. त्यामुळे औषधांच्या खर्चाबरोबरच प्रत्येक रक्तसंक्रमणासाठी लागणाऱ्या साहित्याचा खर्चही कुटुंबांला सहन करावा लागतो. मात्र यावरील उपचार महागडे असल्याने सर्वसामान्यांना आर्थिक बोजा सहन करावा लागतो. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी उपचारांमध्ये सातत्य राखताना अडचणीचे ठरते.

त्यामुळे कर्करोगाच्या रुग्णांना औषधांच्या किमतींमध्ये दिलासा दिला आहे, त्याप्रमाणे थॅलेसेमियाने ग्रस्त आणि अनेक वर्षे नियमित रक्तसंक्रमणाची गरज असलेल्या बालकांचाही यासाठी विचार होणे आवश्यक आहे. यासंदर्भात डॉ. रुघवानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाला पत्र लिहून त्यांचे लक्ष वेधले आहे.

वैद्यकीय साहित्याच्या किमतींचाही आढावा घ्या

थॅलेसेमियाच्या उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या डिफेरासिरॉक्स, डिफेरिप्रोन आणि डिफेरॉक्सामाइन या शरीरातील अतिरिक्त लोह कमी करणाऱ्या औषधांचा तसेच सिकलसेलच्या उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या हायड्रॉक्सीयुरिया यांसारख्या औषधांच्या किमतींचा आढावा घेण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. औषधांव्यतिरिक्त रक्तसंक्रमणासाठी वापरले जाणारे ब्लड ॲडमिनिस्ट्रेशन सेट, ल्युकोसाइट रिडक्शन फिल्टर, वैद्यकीय साहित्य आणि अन्य संबंधित वस्तूंच्या किमतींमध्ये पारदर्शकता आणण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. या साहित्याच्या खरेदी किमती आणि रुग्णांकडून आकारल्या जाणाऱ्या अंतिम किमती यातील फरकाचा अभ्यास करून योग्य कमाल किंमत निश्चित करण्याच्या शक्यतांचा विचार करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

संयुक्त समिती स्थापन करण्याची सूचना

औषधे आणि वैद्यकीय साहित्याच्या किमतींचा अभ्यास करण्यासाठी राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरण (एनपीपीए), वैद्यकीय तज्ज्ञ, रक्तसंक्रमण तज्ज्ञ आणि रुग्ण संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली संयुक्त समिती स्थापन करावी. या समितीने संबंधित औषधे आणि वैद्यकीय साहित्याचा प्रत्यक्ष उत्पादन खर्च, वितरण खर्च, खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचा अभ्यास करावा. त्यानंतर योग्य कमाल किंमत निश्चित करणे आणि व्यापारी नफ्याचे प्रमाण ठरविण्याच्या शक्यतांचा विचार करावा, तसेच अत्यावश्यक औषधे आणि रक्तसंक्रमणासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमतींमध्ये एकसमानता व पारदर्शकता राखण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे तयार करावी.

आजार कर्करोग असो, थॅलेसेमिया असो किंवा सिकलसेल, जीवनरक्षक उपचारांची उपलब्धता कोणत्याही कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असता कामा नये. प्रत्येक गरजू रुग्णापर्यंत दर्जेदार वैद्यकीय उपचार पोहोचवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.-डॉ. विंकी रुघवानी, अध्यक्ष,थॅलेसेमिया अँड सिकल सेल सोसायटी ऑफ इंडिया