मुंबई : भारतीय शास्त्रीय संगीत, विशेषतः बासरी आणि इतर संगीतप्रकारांचे संवर्धन व प्रसार करण्यासाठी ‘गुरुकुल प्रतिष्ठान’ या संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे येथील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात ३ व ४ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता १७ व्या बासरी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

दोन दिवसांच्या या संगीत महोत्सवात प्रसिद्ध बासरीवादक विवेक सोनार यांच्या नेतृत्वात १०० बासरीवादक ‘बासरी सिम्फनी’ कार्यक्रमाचे सादरीकरण करणार आहेत. महोत्सवात ज्येष्ठ व नामवंत कलाकार शुभा मुदगल, कृष्णप्रिया, अदिती भागवत, विवेक सोनार, मीता पंडित यांच्या संगीताचा आस्वाद घेण्याची संधी संगीत प्रेमींना मिळणार आहे.

महोत्सवात पहिल्या दिवशी कृष्णप्रिया यांचे कथक आधारित सादरीकरण होणार असून त्यांना नृत्यांगना अदिती भागवत आणि बासरीवादक विवेक सोनार साथ करतील. त्यानंतर मीता पंडित यांचे शास्त्रीय गायन होईल. या दिवसाचा समारोप प्रसिद्ध बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीवादनाने होणार आहे. त्यांना वाराणसी येथील संकटमोचन मंदिराचे महंत विश्वंभरनाथ मिश्रा (पखवाज) साथसंगत करणार आहेत.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी विवेक सोनार यांच्या नेतृत्वाखाली वार्षिक बासरी उत्सव “बासरी सिम्फनी” सादर होईल. त्यात ८ ते ८० वयोगटातील १०० बासरीवादक सहभागी होतील. दुसऱ्या दिवशी ‘पंडित हरिप्रसाद चौरसिया पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. यंदा जावेद अख्तर यांना या पुरस्काराने सन्मानित केले जाईल. महोत्सवाचा समारोप शुभा मुदगल यांच्या शास्त्रीय गायनाने होईल.

‘बासरी उत्सव’ हा केवळ संगीत महोत्सव नसून बासरी परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठीची ती दीर्घकालीन चळवळ आहे. या कार्यक्रमामुळे बासरीच्या विविध शैली सादर करण्याची, तसेच नवोदित कलाकारांना व्यासपीठ देण्याची संधी मिळते, असे विवेक सोनार म्हणाले.