मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ठाणे – भिवंडी – कल्याण मेट्रो ५ मार्गिकेचा विस्तार उल्हासनगरपर्यंत करण्यात येणार आहे. तर या विस्तारित मार्गिकेतील धामणकर नाका ते दुर्गाडी टप्पा २, दुर्गाडी ते कल्याण टप्पा ३ आणि भोईरवाडी ते उल्हासनगर ५ अ टप्प्याच्या बांधकामाचा मार्ग अखेर आता मोकळा झाला आहे. या तिन्ही टप्प्यांच्या बांधकामासाठी एमएमआरडीएने नुकत्याच निविदा प्रसिद्ध केल्या. ही निविदा प्रक्रिया अंतिम करून नवीन वर्षात या तिन्ही टप्प्यांतील मेट्रो मार्गिकांच्या प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.
एमएमआरडीएो ठाणे – भिवंडी – कल्याण दरम्यानच्या २४.९ किमी लांबीच्या आणि ८ हजार ४०० कोटी रुपय खर्चाच्या मेट्रो ५ मार्गिकेचे काम दोन टप्प्यांत हाती घेतले. त्यानुसार कापूरबावडी ते धामणकर नाका या पहिल्या टप्प्याचे काम सुरू असून आतापर्यंत या टप्प्याचे ९८ टक्के काम पूर्ण झाले आहे. या टप्प्याचे काम पूर्ण करून सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त करून २०२७ च्या सुरुवातीला हा टप्पा कार्यान्वित केला जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मेट्रो ५ मार्गिकेतील विस्तारित मार्गिकांच्या कामालाही २०२७ मध्येच सुरुवात करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. त्यामुळेच मेट्रो ५ मार्गिकेतील टप्पा २, ३ आणि ५ अ साठी एमएमआरडीएने निविदा प्रसिद्ध केल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, मेट्रो ५ मार्गिकेचे बांधकाम कल्याण ते भिवंडी आणि भिवंडी ते कल्याण असे दोन टप्प्यांत केले जाणार होते.
मात्र, भिवंडी ते कल्याण टप्पा २ मार्गिकेत मोठ्या प्रमाणात पुनर्वसन व पुनर्वसाहतीसंबंधी समस्या असल्यामुळे पूर्वीच्या मेट्रो मार्गात सुधारणा करून दुर्गाडी ते कल्याण या उन्नत मार्गिकेचे भूमिगत मार्गिकेमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, काही कारणाने विस्तारित मेट्रो ५ मार्गिकेच्या संरेखनात राज्य सरकारच्या निर्देशानुसार एमएमआरडीएने पुन्हा सुधारणा केली. त्यानुसार मेट्रो ५ मार्गिकेचा विस्तार टप्पा २ अंतर्गत धामणकर नाका ते दुर्गाडीपर्यंत, टप्पा ३ अंतर्गत दुर्गाडी ते कल्याणपर्यंत आणि ५ अ अंतर्गत भोईरवाडी ते उल्हासनगरपर्यंत करण्याचा निर्णय घेतला. या नवीन संरेखनास काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने मान्यता दिली. त्यानंतर संरेखनाचा हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी गेला होता. त्यासही केंद्राने मान्यता देऊन यासंबंधीची अधिसूचना ऑगस्टमध्ये प्रसिद्ध करून विस्तारित मार्गिकेचा मार्ग मोकळा केला. तर आता या विस्तारित टप्प्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यासाठी पहिले पाऊल उचलत एमएमआरडीएने निविदा प्रसिद्ध केली आहे.
निविदेनुसार २ डिसेंबरपर्यंत इच्छुक कंपन्यांना निविदा सादर करता येणार आहे. त्यानुसार २०२७ च्या सुरुवातीला निविदा प्रक्रिया पूर्ण करून त्यानंतर लगेचच या तिन्ही टप्प्यांच्या कामाला सुरुवात करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर ठाणे, कल्याण आणि उल्हासनगरमधील रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यांचा प्रवास अतिजलद, सुकर होणार आहे. दरम्यान, धामणकर नाका ते दुर्गाडी टप्पा १०.४८ किमी लांबीचा असून यात ६ स्थानकांचा समावेश आहे. या टप्प्याच्या कामासाठी ७ हजार ३२६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. दुर्गाडी ते कल्याण दरम्यानचा टप्पा ३ सुमारे ११.८२ किमी लांबीचा असून यात सात स्थानकांचा समावेश आहे. या टप्प्याच्या कामासाठी ४ हजार ६३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तर भोईरवाडी ते उल्हासनगर ५ अ टप्पा ५.२७ किमीचा असणार आहे.
