मुंबई : ठाणेकर आणि भिवंडीकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ठाणे – भिवंडी – कल्याण मेट्रो ५ मार्गिकेतील ठाणे – धामणकर नाका दरम्यानच्या ११.९ किमीच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही दिवसांत या टप्प्याचे १०० टक्के काम पूर्ण करून त्याच्या संचालनासाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) दिल्लीच्या पथकाला पाचरण करून चाचण्या घेतल्या जाणार आहेत. तर या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त करून घेत ठाणे ते धामणकर नाका टप्प्याचे संचालन वर्षाअखेर केले जाणार आहे. त्यामुळे डिसेंबरअखेरीस ठाणे ते धामणकर नाकादरम्यान मेट्रो धावणार आहे.

एमएमआरडीएच्या १४ मेट्रो मार्गिकेतील महत्त्वाच्या अशा मेट्रो ५ मार्गिकेतील ठाणे ते धामणकर नाका अशा पहिल्या टप्प्याचे काम सुरु आहे. तर लवकरच धामणकर नाका ते दुर्गाडी अशा दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. दरम्यान, मेट्रो ५ मार्गिकेच्या आराखड्यात एमएमआरडीएकडून मोठे बदल करण्यात आले असून मार्गिकेचा उल्हासनगरपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. त्यामुळे आता मेट्रो ५ मार्गिका एकूण ३४.२१ किमीची झाली आहे.

यात टप्पा १, टप्पा २ आणि आणि ५ अ असे तीन टप्पे असणार आहेत. ठाणे ते धामणकर नाका टप्पा १ एकूण ११.९ किमीचा, धामणकर नाका ते दुर्गाडी टप्पा २ एकूण १०.४८ किमीचा तर दुर्गाडी – खडकपाडा – भोईरवाडी – कल्याण – उल्हासनगर असा ५ अ टप्पा असणार आहे. त्यानुसार टप्पा १ चे काम मागील काही वर्षांपासून सुरू असून आता बांधकाम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली.

अंदाजे ६७४१ कोटी रुपये खर्चाच्या या टप्प्याचे काम येत्या काही दिवसांत पूर्ण करून या टप्प्याच्या संचालनाच्यादृष्टीने पावले उचलली जाणार आहेत. त्यानुसार लवकरच या टप्प्यासाठी सीएमआरएस चाचण्यांना सुरुवात करून सुरक्षा प्रमाणपत्र घेत हा टप्पा वर्षाअखेरीस वाहतूक सेवेत दाखल करण्याचे नियोजन असल्याचेही एमएमआरडीएकडून सांगण्यात आले. हा टप्पा सेवेत दाखल झाल्यास ठाणेकरांना आणि भिवंडीकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. वाहतूक कोंडीतून सुटका होणार असून गारेगाव आणि अतिजलद प्रवास करता येणार आहे. हा टप्पा सेवेत दाखल झाल्यास प्रवाशांना बाळकुम नाका, कशेळी, काल्हेर, पूर्णा, अंजूरफाटा आणि धामणकर नाका अशा सहा स्थानकांवरून प्रवास करता येणार आहे.