मुंबई : ठाणे-ते बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पातील बोरिवली येथील लॉन्चिंग शाफ्टचे काम अनेक महिने रखडले होते. लॉन्चिंग शाफ्टच्या जागेवरील अंदाजे ६०० बांधकामे हटविण्यात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) अखेर यश आले आहे. २७,३४४ चौ. मीटर जागा रिकामी झाल्याने आता बोरिवली लॉन्चिंग शाफ्टच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. आता लॉन्चिंग शाफ्टच्या प्राथमिक कामांना सुरुवात झाली असून शक्य तितक्या लवकर या लॉन्चिंग शाफ्टमध्ये टनेल बोअरिंग मशीन (टीबीएम) सोडून भुयारीकरणाच्या कामास सुरुवात करण्याचा प्रयत्न एमएमआरडीएचा असणार आहे.

ठाणे – बोरिवली प्रवास अतिजलद करता यावा यासाठी एमएमआरडीएने ११.८ किमी लांबीचा आणि अंदाजे १८ हजार कोटी रुपये खर्चाचा ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते. भूमिपूजनानंतर एमएमआरडीएकडून ठाणे लॉन्चिंग शाफ्टच्या कामाला सुरुवात करून काम पूर्ण करण्यात आले आहे. एप्रिलमध्ये ”नायक” नावाच्या टीबीएमद्वारे ठाणे लॉन्चिंग शाफ्टमधून भुयारीकरणास सुरुवात करण्यात आली. लवकरच याच लॉन्चिंग शाफ्टमधून ”अर्जुना” नावाचे टीबीएम सोडून दुसऱ्या बाजूच्या बोगद्याच्या खोदकामास सुरुवात केली जाणार आहे.

ठाण्यात भुयारीकरणाच्या कामाने वेग घेतला असताना बोरिवली लॉन्चिंग शाफ्टचे काम मात्र रखडले होते. हे काम याआधीच सुरू होणे अपेक्षित होते. पण लॉन्चिंग शाफ्टसाठीची जागाच एमएमआरडीएच्या ताब्यात येत नसल्याने मागील दोन वर्षांपासून बोरिवली लॉन्चिंग शाफ्टचे काम रखडले होते. या जागेवर अंदाजे ६०० विविध प्रकारची बांधकामे होती. यात मोठ्या संख्येने झोपड्यांचा समावेश होता. झोपडीपट्टीवासीयांचे आणि इतर बाधितांच्या पुनर्वसनाचे ठोस धोरण नसल्याने भूसंपादनास विलंब होत होता. पण अखेर आता एमएमआरडीएला २७,३४४ चौ. मीटर जागा रिकामी करून ताब्यात घेण्यात यश आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मदतीने एमएमआरडीएने पुनर्वसनाचा, भूसंपादनाचा प्रश्न निकाली काढला आहे. झोपु प्राधिकरणाकडून एमएमआरडीएला पुनर्वसनासाठी ४५० घरे उपलब्ध करून दिली. तर १४५ घरे एमएमआरडीएने आपल्या प्रकल्पातून उपलब्ध करून त्यात बाधितांचे पुनर्वसन केले आहे. तसेच एका शाळेचेही योग्य पुनर्वसन करण्यात आले असून आता केवळ एका ग्रंथालय, व्यायामशाळा आणि बुद्ध विहाराचे स्थलांतर शिल्लक असून हे स्थलांतरही लवकरच केले जाणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, ६०० बांधकामे हटविण्यात आल्याने दोन वर्षे रखडलेल्या बोरिवली लॉन्चिंग शाफ्टच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. लॉन्चिंग शाफ्टच्या प्राथमिक कामास सुरुवात करण्यात आली असून आता कामास वेग देत लॉन्चिंग शाफ्टचे काम शक्य तितक्या लवकरच पूर्ण करण्याचे नियोजन एमएमआरडीएचे आहे.