मुंबई : ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पातील एका महत्त्वाच्या टप्प्याला उद्या, मंगळवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) सुरुवात केली जाणार आहे. १३ मीटर व्यासाचे, १५० मीटर लांबीचे आणि ६० मीटर रुंदीचे आतापर्यंतचे सर्वात मोठे ‘नायक’ नावाचे टनेल बोअरिंग मशीन (टीबीएम) ठाणे लॉन्चिंग शाफ्टमध्ये, अर्थात भूगर्भात सोडले जाणार आहे. तर १०-१२ दिवसांनी प्रत्यक्ष भुयार खोदण्याच्या कामाला सुरुवात होणार असून ठाण्याहून बोरिवलीच्या दिशेने भुयारीकरण पूर्ण करून ‘नायक’ भूगर्भातून बाहेर येणार आहे. ‘नायक’ भूगर्भात सोडल्यानंतर टप्प्याटप्प्याने उर्वरित तीन टीबीएम चालू वर्षातच भूगर्भात सोडून भुयारीकरणाच्या कामास सुरुवात करण्याचे नियोजन एमएमआरडीएचे आहे.
ठाणे ते बोरिवली अंतर १५ मिनिटांत पार करता यावे, यासाठी एमएमआरडीएने ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेतला आहे. ११.८ किमीच्या या प्रकल्पाअंतर्गत भुयारीकरणाच्या कामासाठी ठाणे आणि बोरिवली येथे लॉन्चिंग शाफ्ट तयार करण्यात येणार आहेत. त्यानुसार ठाण्यातील लॉन्चिंग शाफ्टचे काम पूर्ण झाले आहे. ठाण्यातील लॉन्चिंग शाफ्टमधून दोन आणि बोरिवलीतील लॉन्चिंग शाफ्टमधून दोन असे एकूण चार टीबीएम भूगर्भात सोडून भुयाराचे काम केले जाणार आहे. त्यानुसार ठाण्यातील लॉन्चिंग शाफ्टमध्ये सोडण्यात येणारे दोन टीबीएम प्रकल्पस्थळी दाखल झाले आहेत.
‘नायक’ आणि ‘अर्जुन’ अशी या टीबीएमची नावे असून हे पहिले देशी बनावटीच टीबीएम यंत्र आहे. ‘नायक’ टीबीएम ११० भागांमध्ये हैदराबादहून मुंबईत आले असून त्यानंतर प्रकल्पस्थळी या यंत्राच्या सुट्या भागांची जोडणी करण्यात आली. तर आता १३ मीटर व्यासाचे, १५० मीटर लांबीचे आणि ६० मीटर रुंदीचे टीबीएम मंगळवारी भुगर्भात सोडले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत ठाण्यातील लॉन्चिंग शाफ्ट येथे भुयारीकरणाच्या प्रारंभाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
‘नायक’ मंगळवारी भूगर्भात सोडल्यानंतर १०-१२ दिवसांनी या टीबीएमकडून प्रत्यक्ष भुयारीकरणाच्या कामास सुरुवात होणार आहे. ठाण्याहून बोरिवलीच्या दिशेने भुयारीकरण करत करत हे टीबीएम बोरिवली लॉन्चिंग शाफ्टमधून बाहेर पडणार आहे. त्यासाठी अंदाजे दोन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. ‘नायक’ टीबीएमद्वारे भुयारीकरण सुरू झाल्यानंतर पुढील टप्प्यात, येत्या काही महिन्यांत दुसरे ‘अर्जुन’ टीबीएमही ठाणे लॉन्चिंग शाफ्टमध्ये सोडण्यात येणार आहे. हे टीबीएमही ठाण्याहून बोरिवलीच्या दिशेने भुयारीकरण करून बोरिवलीतून बाहेर पडणार आहे. त्याला बाहेर पडण्यासाठी दोन वर्षे लागणार आहेत. दरम्यान बोरिवली लॉन्चिंग शाफ्टच्या कामास नुकतीच सुरुवात झाली आहे.
भूसंपादनाच्या वादामुळे लॉन्चिंग शाफ्टच्या कामाला बराच विलंब झाला आहे. हा प्रकल्प २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन एमएमआरडीएचे आहे. त्यामुळे आता बोरिवली लॉन्चिंग शाफ्टसाठीच्या भूसंपादनाचा वाद निकाली काढण्यात आला आहे. लॉन्चिंग शाफ्टला नुकतीच सुरुवात झाली आहे. हे काम वेगाने पूर्ण करून पावसाळ्यानंतर बोरिवली लॉन्चिंग शाफ्टमधूनही भुयारीकरणाच्या कामाला सुरुवात केली जाईल. पहिले टीबीएम पावसाळ्यानंतर आणि त्यानंतर काही दिवसांनी दुसरेही टीबीएम लॉन्चिंग शाफ्टमध्ये सोडले जाईल. चालू वर्षातच दोन्ही दिशांनी चारही टीबीएमद्वारे भुयारीकरण सुरू होईल आणि हा प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण होईल, अशी माहिती महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली.
म्हणून ‘नायक’ नाव
अंदाजे २०० टन वजनाचे ‘नायक’ टीबीएम दिवसाला १५ मीटरचे भुयारीकरण करणार आहे. अवाढव्य अशा पहिल्या टीबीएमला ‘नायक’ असे नाव देण्यात आले आहे. हे टीबीएम पर्यावरणदृष्ट्या अत्यंत संवेदनशील अशा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणार आहे. त्यामुळे येथील पर्यावरणाला आणि वन्यजीव, वन्यप्राण्यांच्या अधिवासाला कोणताही धक्का पोहोचू नये, यादृष्टीने या टीबीएमची बांधणी करण्यात आली आहे. त्यामुळेच या प्रकल्पासाठी वापरण्यात येणाऱ्या चारही टीबीएमला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील झाडे, फुले, पक्षी-प्राण्यांची नावे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ‘नायक’ हे नाव उद्यानातील ‘नायक’ नावाच्या फुलपाखरावरून देण्यात आले आहे. तर ठाण्यातील लॉन्चिंग शाफ्ट येथे दुसरे टीबीएमही दाखल झाले असून या टीबीएमला ‘अर्जुन’ नाव देण्यात आले आहे. १६० भागांत मुंबईत दाखल झालेल्या या टीबीएमचे नाव राष्ट्रीय उद्यानातील ‘अर्जुन’ नावाच्या झाडावरून देण्यात आले आहे. उर्वरित दोन टीबीएमही तयार असून लवकरच तेही मुंबईत दाखल होणार आहे. मुंबईत आल्यानंतर या टीबीएमना नावे दिली जाणार आहेत.
