मुंबई : ठाणे ते बोरिवली प्रवास १५ मिनिटांवर आणणाऱ्या भुयारी मार्गाच्या कामाला दोन आठवड्यांपूर्वी मुहूर्त मिळाला असला तरी या मार्गात बोरिवलीतील राजेंद्रनगर येथे महापालिकेकडून बांधण्यात येत असलेल्या एका पुलाचा अडथळा निर्माण झाला आहे. या पुलाच्या पेचामुळे भुयारी मार्गाचे बोरिवलीकडील आरेखनच अद्याप अंतिम झालेले नाही. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील अडथळ्यांची मालिका कायम आहे. दुसरीकडे गेली तीन-चार वर्षे निर्माणाधीन असलेल्या या पुलाचे बांधकाम रखडून या परिसरात सध्या प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.
ठाणे–बोरिवली दरम्यानचा प्रवास १५ ते २० मिनिटांवर आणण्याकरिता या ११.८४ किलोमीटर भुयारी मार्गाची (प्रत्येकी दुहेरी आणि आपत्कालीन मार्गिका) योजना आखण्यात आली. मे, २०२८मध्ये हा मार्ग पूर्ण होणे अपेक्षित आहे. राजीव गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या भुयारी मार्गाला परवानगी मिळवताना दिव्यातून जावे लागले. त्यातच वर्षभरापूर्वी आरेखनातील त्रुटी लक्षात आल्यापासून पुलाबरोबरच बोरिवलीकडील भुयारी मार्गाचे कामही रखडले. भुयारी मार्गाच्या मूळ आरेखनानुसार पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या पलीकडील बाजूला असलेल्या मागाठाणे येथे भुयारी मार्गाचे तोंड उघडते. तर बोरिवली पूर्वेकडील अडचणीचा ठरणारा पूल करिअप्पा पुलाच्या पायथ्यापासून सुरू होतो. हा पूल कोरा केंद्र उड्डाणपुलाचाच वाढीव भाग आहे.
पूर्वेकडे राजेंद्रनगर परिसरात होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी हा पूल बांधण्यात येत आहे. तो पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या अलीकडेच उतरतो. मात्र ठाण्याहून आलेल्या दुपदरी भुयारी मार्गाची एक मार्गिका महामार्गाच्या पलीकडे आणण्यात येणार असल्याने हा पुल अडचणीचा ठरत आहे. यंत्रणांमधील समन्वयाअभावी उभा राहिलेला पेच सोडविण्याकरिता मुख्यमंत्री कार्यालयाला हस्तक्षेप करावा लागला. पालिका, एमएमआरडीच्या अधिकाऱ्यांसह संबंधितांच्या बैठका घेतल्यानंतर समन्वयाने तोडगा काढून सुधारित आरेखन करावे, अशी सूचना केली गेली. पण, अजूनही आरेखन झालेले नाही.
झोपड्यांचे पुनर्वसन लवकरच
पुलाच्या मार्गात येणाऱ्या झोपड्यांचे पुनर्वसन रखडल्यानेही पुलाचे काम थांबले आहे. मात्र या झोपड्यांचा अडथळा येत्या १५ ते २० दिवसांत दूर केला जाईल. मात्र, भुयारी मार्गाचा अडथळा कायम राहणार आहे. त्यावर जोपर्यंत तोडगा निघत नाही, तोपर्यंत पुलाचे काम सुरू करता येणार नाही, अशी माहिती पालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली.
अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे यांनी या प्रकरणी समन्वय बैठक घेतली होती. यासंबंधी अभ्यास करण्याची जबाबदारी आयआयटीकडे सोपविण्यात आली आहे. आयआयटीने अभ्यास पूर्ण केला असून लवकरच अहवाल सादर केला जाईल. तसेच, प्रकल्पात बाधित होणारी एकूण २६७ बांधकामे हटवावी लागणार आहेत. या कामाला आयुक्तांकडून गती दिली जाईल आणि नवीन आरेखनानुसार हे काम पूर्ण केले जाईल. – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
भुयारी मार्गात पूल अडचणीचा ठरत होता तर पुलाचे बांधकाम थांबवायला हवे होते, परंतु खांब उभारण्याचे काम सुरूच होते. कित्येक वर्षे हा पूल अर्धवट अवस्थेत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडली आहे. कोट्यवधींचे विकास प्रकल्प राबविताना पालिका आणि एमएमआरडीएमध्ये कसा समन्वयाचा अभाव असतो, हे यावरून दिसून येते. – नयन कदम, सरचिटणीस, मनसे
