मुंबई : ठाणे खाडी पूल-३च्या बांधकामामुळे पारंपरिक कोळी समाजाच्या उपजीविकेवर झालेला परिणाम आणि त्यांना झालेले नुकसान याचे मूल्यांकन करण्यासाठी उच्चस्तरीय कृती दल स्थापन करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच राज्य सरकारला दिले. नुकसानाच्या मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिल्याच्या दिवसापासून सहा महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. बाधित कोळी बांधवांना भरपाई मिळण्यासाठी अनिश्चित काळापर्यंत वाट पाहायला लावणे योग्य नाही, अशी टिप्पणीही न्यायालयाने हे आदेश देताना दिले.

कृती दलात नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त, मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रतिनिधी आणि प्रकल्प राबवणाऱ्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) अधिकाऱ्यांचा समावेश असेल. तसेच, मत्स्यव्यवसाय विभागाच्या मदतीने ही समिती बाधित कुटुंबांची ओळख पटवेल आणि त्यांच्या प्रत्यक्ष उत्पन्नातील नुकसानाचे मूल्यांकन करेल, असे न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.

ही समिती ‘सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट (सीएमएफआरआय) आणि टाटा सामाजिक विज्ञान संस्था (टीस) यांच्या अहवालांचाही विचार करू शकते. मात्र, अंतिम मूल्यांकन करताना वास्तव परिस्थिती प्रतिबिंबित होईल, याची दक्षता घेणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने प्रामुख्याने स्पष्ट केले.

वाशीगाव, जुहूगाव, कोपरखैरणे, घणसोली आणि दिवा येथील पारंपरिक कोळी बांधवांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘मरियाई मच्छिमार सहकारी संस्था मर्यादित’ आणि अन्य एका मच्छिमार संस्थेने दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी करताना न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. ठाणे खाडीत सुरू असलेले बांधकाम, सागरी कामे आणि हालचालींवर घातलेले निर्बंध यामुळे पारंपरिक मासेमारीची क्षेत्रे बाधित झाली आहेत. परिणामी, मासे पकडण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर घट झाली असून त्यामुळे सतत आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता.

पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या मच्छिमारांसाठी महाराष्ट्र सरकारने मार्च २०२३ मध्ये एक भरपाई धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार, परिणामांचे स्वरूप आणि व्याप्ती लक्षात घेऊन २५ हजार रुपयांपासून ते ६ लाख रुपयांपर्यंतची भरपाई दिली जाऊ शकते. याव्यतिरिक्त, एसएसआरडीसीने अंतरिम भरपाई म्हणून १० कोटी रुपये यापूर्वी न्यायालयात जमा केले होते. त्यातून २०२२ मध्ये ९०० बाधित कुटुंबांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे वाटप करण्यात आले होते, असेही न्यायालयाने नमूद केले. तथापि, न्यायालयाने टीसच्या अहवालातील त्रुटींवर बोट ठेवले. त्यात सुमारे १४१ कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तसेच, हा अहवाल अधिकृत नोंदींद्वारे पुरेशी पडताळणी न करता, मच्छिमारांनी स्वतःहून सांगितलेल्या उत्पन्नावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून होता याकडे लक्ष वेधून कृती दलाने नुकसानाचे वास्तविक प्रमाण निश्चित करून पुराव्यांच्या आधारे योग्य रक्कम ठरवली पाहिजे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

प्रकरण काय ?

शीव-पनवेल महामार्गावर एसएसआरडीसीद्वारे सहा पदरी पुलाचे बांधकाम केले जात आहे. याचिकाकर्त्यांनी या प्रकल्पामुळे पारंपरिक मासेमारीच्या उपजीविकेवर परिणाम होत असल्याचा दावा करून उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर २०२१ मध्ये हा वाद सुरू झाला. त्याच वर्षी ऑगस्टमध्ये बांधकामास परवानगी देताना, न्यायालयाने स्थानिक मच्छिमारांच्या पारंपरिक मासेमारी हक्कांवर होणारा परिणाम मान्य केला. नुकसानाचे मूल्यांकन करण्याची जबाबदारी असलेल्या सीएमएफआरआयने २०२३ मध्ये एक अहवाल सादर केला. त्यात मासेमारीच्या कामांवर झालेल्या तात्पुरत्या आणि कायमस्वरूपी परिणामांची पुष्टी केली होती, परंतु नुकसानाचे प्रमाण निश्चित केले नव्हते.