मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या ठाणे खाडी पूल-३ प्रकल्पातील दक्षिणेकडील अर्थात मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्यापूर्वी ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे.
सप्टेंबरअखेरीस वा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली होणार आहे. ही मार्गिका वाहतुकीस खुली झाल्यास मुंबईहून पुण्याकडे जाण्यासाठी खाडीपूल-२ सह नवीन ठाणे खाडी पूल-३ चा पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मुंबई – पुणे प्रवास वाहतूक कोंडीमुक्त, वेगवान होणार आहे. मुंबई – पुणे प्रवासासाठी सध्या दोन खाडीपूल सेवेत आहेत. या पार्श्वभूमीवर एमएसआरडीसीने ठाणे खाडी पूल-३ प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प आतापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र तांत्रिक अडचणींमुळे प्रकल्प लांबणीवर पडला आहे. आता मात्र या प्रकल्पाने वेग घेतला आहे. या प्रकल्पातील दक्षिणेकडील मार्गिकेचे अर्थात मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्याची माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. येत्या १५ दिवसांत ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होईल, असेही त्यांनी सांगितले. या मार्गिकेच्या लोकार्पणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेळ घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
हेही वाचा : जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्रीपद शोभेचे बाहुले!
प्रवाशांना दिलासा
दक्षिणेकडील बाजू वाहतुकीस खुली झाल्यास मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालक, प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. ठाणे खाडी पूल-२ सह आणखी एक वाहतुकीचा पर्याय ठाणे खाडी पूल-३ च्या रूपाने उपलब्ध होणार आहे. त्यामुळे खाडी पूल-२ वरील वाहतूक कोंडी दूर होणार आहे, तर मुंबई – पुणे प्रवास वेगवान होणार आहे. मात्र त्याच वेळी पुणे – मुंबई वाहतूक कोंडीमुक्त आणि वेगवान प्रवासासाठी प्रवासी, वाहनचालकांना आणखी चार महिने वाट पाहावी लागणार आहे. उत्तरेकडील मार्गिकेचे अर्थात पुणे – मुंबई मार्गिकेचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम डिसेंबर २०२४ अखेरीस पूर्ण होईल. त्यानंतर, जानेवारी २०२५ मध्ये ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली होईल, असेही गायकवाड यांनी सांगितले. त्यामुळे पुणे – मुंबई प्रवास व्हाया ठाणे खाडी पूल – ३ असा करण्यासाठी जानेवारी २०२५ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
नायर रुग्णालयात विद्यार्थिनीचा लैंगिक छळ, सहाय्यक प्राध्यापक निलंबित
ठाणे खाडी पूल३ प्रकल्प…
●ठाणे खाडी पूल-२ वरील वाहनांचा वाढता भार कमी करण्यासाठी ठाणे खाडी पूल-३ प्रकल्प हाती २०१५ मध्ये खाडी पूल-३ उभारण्याचा निर्णय २४ नोव्हेंबर २०१७ मध्ये प्रकल्पास राज्य सरकारची मंजुरी
●२०२० पासून कामास सुरुवात ५५९ कोटी रुपये खर्च (निविदेनुसार) (मूळ खर्च ७७५.५७ कोटी रु.) पुलासाठी १.८३७ खर्च
● ३.८० किमीचा मुंबई पोहच रस्ता तर ९.३० किमीचा नवी मुंबई पोहच रस्ता सहा पदरी खाडी पूल