मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ठाणे खाडी किनारा मार्गातील आनंदनगर ते बाळकूम टप्पा २ प्रकल्प अडचणीत आला आहे. या मार्गामुळे ठाणे खाडीतील फ्लेमिंगोच्या अधिवासास आणि २.७२ हेक्टर वनजमिनीवरील ३७५४ कांदळवनांना धोका पोहोचणार आहे. त्यामुळे टप्पा २ प्रकल्पाच्या संरेखनात बदल करण्याचे महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने (एमसीझेडएमए) एमएमआरडीएला निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता एमएमआरडीएला संरेखनात बदल करून नव्याने प्रस्ताव मान्यतेसाठी एमसीझेडएमएकडे पाठवावा लागणार आहे.
ठाण्यातील, घोडबंदर रोडवरील आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एमएमआरडीएने ठाणे खाडी किनारा मार्ग प्रकल्प हाती घेतला आहे. त्यानुसार हा प्रकल्प दोन टप्प्यात राबविण्यात येत असून यातील १३.४५ किमीच्या खारेगाव ते गायमुख अशा पहिल्या टप्प्याचे काम सध्या सुरू आहे. तर आनंदनगर ते बाळकूम अशा ७.३ किमीच्या दुसऱ्या टप्प्यालाही लवकरात लवकर सुरुवात करण्याचे नियोजन एमएमआरडीएचे आहे. त्यानुसार टप्पा २ चा प्रस्ताव मान्यतेसाठी एमसीझेडएमएकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता. पर्यावरणासंबंधीची ही मंजुरी प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे.
असे असताना एमसीझेडएमएच्या आपल्या ११ ऑगस्टच्या आपल्या २०१ व्या बैठकीत या प्रकल्पामुळे पर्यावरणाला मोठा धक्का बसणार असल्याचे म्हणत प्रकल्पाच्या संरेखनात बदल करण्यासह इतर पर्यायी मार्गाचा विचार करण्याचे निर्देश एमएमआरडीएला दिले आहेत. तसेच या प्रकल्पामुळे कांदळवनावर होणारा परिणाम अधिक स्पष्टपणे मांडावा यासाठी राज्य वन विभागाच्या कांदळवन संरक्षण कक्षाचा अहवाल सादर करण्याचेही निर्देश एमसीझेडएमएने एमएमआरडीएला दिले आहेत. त्याचवेळी ठाणे खाडीवर, फ्लेमिंगोच्या अधिवासावर होणाऱ्या परिणामांचाही सविस्तर अहवाल आणि त्यावरील उपाययोजनांची माहिती सादर करण्यास एमएमआरडीएला सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दुसऱ्या टप्प्यामुळे पर्यावरणाला धक्का पोहोचणार असल्याचे म्हणत ठाणेकरांसह पर्यावरणप्रेमी आणि अभ्यासकांनीही या प्रकल्पावर आक्षेप घेतला आहे. यासंबंधी तक्रारीही केल्या आहेत. या तक्रारींचीही दखल एमसीझेडएमएने घेतली आहे. त्यानुसार या प्रकल्पाविरोधातील तक्रारींसंबंधीचाही अहवाल सादर करण्याचे निर्देश एमएमआरडीएला देण्यात आले आहेत. हा प्रकल्प फ्लेमिंगो अभयारण्यातून आणि २.७२ हेक्टर कांदळवनातून जाणार आहे. त्यामुळे ३.७५४ कांदळवनांना आणि फ्लेमिंगोच्या अधिवासाला धोका पोहोचणार आहे. ही बाब लक्षात घेता एमसीझेडएमएने संरेखनात बदल करण्याची वा पर्यायी मार्गाचा विचार करण्याचे निर्देश एमएमआरडीएला दिले आहेत. त्यामुळे हा प्रकल्प आता अडचणीत आला आहे. नव्याने संरेखन तयार करणे वा पर्यायी मार्ग शोधण्याची गरज आता निर्माण झाल्याने प्रकल्पास विलंब होण्याचीही शक्यता आहे. दरम्यान एमएमआरडीएकडे याविषयी विचारणा केली असताना दुसऱ्या टप्प्याचा प्रस्ताव कुठेही रद्द करण्यात आलेला नाही वा नाकारण्यात आलेला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. तर प्रकल्पाविषयी काही अतिरिक्त माहिती एमसीझेडएमएला हवी आहे.
त्यानुसार सुधारित प्रस्ताव नव्याने सादर करण्यात येईल, असेही सूत्रांनी सांगितले. दुसरा टप्पा हा महत्त्वाचा टप्पा असून हा मार्ग प्रस्तावित कोपरी-पाटणी पूल, आनंदनगर ते घाटकोपर उन्नत मार्ग (पूर्वमुक्त मार्ग विस्तार) आणि पूर्व द्रुतगती महामार्गाला जोडतो. त्यामुळे या मार्गाच्या आखणीत बदल केल्यास नियोजित प्रादेशिक रस्त्यांच्या जाळ्यातील सलगता प्रभावित होण्याची शक्यता आहे. तेव्हा हा प्रकल्प मार्गी लावताना पर्यावरणीय संवेदनशील भागात संपूर्ण मार्ग खांबांवर, उन्नत स्वरूपात उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे जमिनीच्या पातळीवर सलग भराव करावा लागणार नसल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे. तसेच अधिकाधिक कांदळवने वाचविण्यासाठी ३० मीटरचे संरचनात्मक स्पॅन वाढवून ४५ ते ५० मीटर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बांधकामासाठी उभारण्यात येणारे तात्पुरते प्रवेश पूल आणि इतर संरचना काम पूर्ण झाल्यानंतर हटविण्यात येणार आहेत. त्यानंतर संबंधित क्षेत्र पूर्ववत करण्याचे नियोजन असून नैसर्गिक भरती-ओहोटीचा प्रवाह आणि खाडीतील चिखलपट्टीच्या नैसर्गिक रचनेवर कायमस्वरूपी परिणाम होणार नाही, याची खबरदारी घेतली जाणार असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान आता नव्याने सुधारित प्रस्ताव एमएमआरडीएकडून एमसीझेडएमएकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. तेव्हा या प्रस्तावावर काय निर्णय होतो, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
……………………….
