मुंबई: ठाण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आणि ठाणे ते वसई, मिरा-भाईंदर प्रवास वेगवान करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) गायमुख ते फाऊंटन हाॅटेल नाका, वसईदरम्यान बोगदा बांधण्याचा निर्णय घेतला आहे. फाऊंटन हाॅटेल नाका ते भाईंदर असा उन्नत रस्ता बांधला जाणार आहे. १५ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठीच्या निविदा मंगळवारी एमएमआरडीएकडून खुल्या करण्यात आल्या असून त्यात मेघा इंजिनियरिंगने बाजी मारली आहे. त्यामुळे आता हा प्रकल्प मेघा इंजिनियरींगच्या माध्यमातून मार्गी लावला जाणार आहे.
घोडबंदर येथे वाहतूक कोंडीचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी एमएमआरडीएकडून गेल्या वर्षी गायमुख ते फाऊंटन हाॅटेल नाका, वसईदरम्यान दुहेरी बोगदा आणि फाऊंटन हाॅटेल नाका ते भाईंदर असा उन्नत रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार याबाबत् प्रस्तावास गेल्या वर्षी प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता घेतली. दरम्यान गायमुख ते फाऊंटन हाॅटेल नाका बोगदा ५.५ किमीचा असून फाऊंटन हाॅटेल नाका ते भाईंदर उन्नत रस्ता १० किमीचा आहे.
बोगदा चार मार्गिकेचा आणि उन्नत रस्ता सहा मार्गिकेचा अशा या प्रकल्पासाठी एमएमआरडीएकडून काही महिन्यांपूर्वी निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार एमएमआरडीएने तांत्रिक निविदा खुल्या केल्या. यात निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र एल अँड टी कंपनीने निविदेसंदर्भात काही आक्षेप घेत उच्च न्यायालयात धाव घेतली आणि आर्थिक निविदा प्रक्रिया अडकली. एल अँड टीच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने आर्थिक निविदा खुल्या करण्यास स्थगिती दिली.
उच्च न्यायालयाने मात्र मंगळवारी एल अँड टीची याचिका फेटाळून लावत आर्थिक निविदा खुल्या करण्याचा मार्ग मोकळा केला. हा मार्ग मोकळा झाल्याबरोबर एमएमआरडीएने मंगळवारी आर्थिक निविदा खुल्या केल्या. या निविदेत मेघा इंजिनियरींग कंपनीने बाजी मारल्याची माहिती सूत्रांनी दिली.सुमारे १५ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी ऋत्विकस अॅपकाॅन, नवयुग, एल अँड टी आणि मेघा या पाच कंपन्यांनी निविदा सादर केल्या होत्या.
मंगळवारी निविदा खुल्या केल्या असता त्यात मेघा इंजिनियरींगने बाजी मारली आहे. आता लवकरच निविदा अंतिम करून कंपनीला कंत्राट दिले जाणार आहे. दरम्यान ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याचे काम हैद्राबादस्थित मेघा इंजिनियरिंगलाच मिळाले आहे. मेघा इंजिनियरिंग कंपनी निवडणूक रोखे खरेदीतील दुसऱ्या क्रमाकांची कंपनी आहे. निवडणूक रोखे खरेदीमुळे ही कंपनी वादात अडकलेली आहे. असे असताना या कंपनीला एमएमआरडीएकडून ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्यानंतर आणखी एका मोठ्या प्रकल्पाचे काम दिले जात आहे.