मुंबई: मुंबईतील वांद्रे- कुर्ला व्यापारी संकुलाच्या धर्तीवर ठाणे, नवी मुंबई आणि मिरा- भाईंदर महापालिका क्षेत्रातही पाॅड टॅक्सी सेवा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास अंमलबजावणी संस्था म्हणून नियुक्त करण्याचाही निर्णयही मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला.

मुंबईकरांच्या सुखकर प्रवासासाठी वांद्रे- कुर्ला संकुलात (बीकेसी) पाॅड टॅक्सी सुरु करण्याचा निर्णय सरकारने यापूर्वीच घेतला आहे. बीकेसीच्या धर्तीवर आता ठाणे, नवी मुंबई आणि मिरा- भाईंदरमध्येही पाॅड टॅक्सी सुरु करण्यात येणार आहे. सार्वजनिक- खाजगी- भागीदारी(पीपीपी) तत्वावर हा प्रकल्प राबविण्यात येणार असून त्यासाठी प्रत्येक शहरांमध्ये किमान पाच हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. ठाण्यातील प्रस्तावित मेट्रो प्रकल्पापासून शहराच्या अन्य भागात महत्वाच्या रस्त्यांवर ही पाॅड टॅक्सी धावणार असून प्रकल्पाचा कोणताही आर्थिक भार महापालिकांवर पडणार नाही.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठाणे, नवी मुंबई आणि मिरा- भाईंदरमधील प्रस्तावित पाॅड टॅक्सी प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली होती. या सल्लागाराने तिन्ही शहरांचे सर्वेक्षण करुन अहवाल सादर केला आहे. त्यानुसार आता पाॅड टॅक्सी प्रकल्प राबविण्यास इच्छुक असलेल्या कंपन्याना तिन्ही शहरांचे सर्वेक्षण करुन अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे.आठवडाभरात हे अहवाल आल्यानंतर कंपन्यांचे अहवाल आणि एमएमआरडीएने नियुक्त केलेल्या सल्लागारचा अहवाल यांचा अभ्यास करुन पाॅड टॅक्सीचा अंतिम आराखडा नगरविकास विभागास सादर करण्याचे आदेश शिंदे यांनी एमएमआरडीएला दिले आहेत.

याबाबत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी संपर्क साधला असता, पेट्राॅन कंपनीने बडोदा येथे पाॅड टॅक्सी प्रकल्प उभारला आहे. अशाच प्रकारे ठाणे जिल्हयातील तीन महापालिकामध्ये पाॅड टॅक्सीचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठी तीन चार कंपन्या इच्छूक असून या प्रकल्पाचा महापालिका किंवा राज्य सरकारवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. पाॅड टॅक्सी ही स्वयंचलित असून कमी जागेत हा प्रकल्प उभारता येतो असेही सरनाईक यांनी सांगितले.