ठाणे , जमिनीच्या वादातून एका वृद्धाची हत्या करणाऱ्या रवी परब (वय ४६) या पोलिसाला ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. पी. रघुवंशी यांनी गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. नौपाडा पोलीस ठाण्यात हा पोलीस कार्यरत होता.
नौपाडा घंटाळी भागात वामन मढवी (वय ८२) यांच्या मालकीचा एक भूखंड होता. या मोक्याच्या भूखंडावर अनेक विकासकांचा डोळा होता. खाकी वर्दीचा वापर करून हा भूखंड आपणास लाटता येईल का, म्हणून परब यानेही हालचाली सुरू केल्या होत्या. मढवी परबला भूखंड देण्यास टाळाटाळ करीत होते. ९ एप्रिल २०११ रोजी परब याने रागाच्या भरात मढवी यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या केली होती.
नौपाडा पोलिसांनी परबला अटक करून त्याच्यावर खटला भरला होता. राहुल व्यास, हेमंत कोळी या साक्षीदारांच्या साक्षी या प्रकरणात महत्त्वाच्या ठरल्या. या प्रकरणात फिर्यादीतर्फे अ‍ॅड. शैलेश सडेकर, सरकारी वकील अ‍ॅड. खामकर यांनी काम पाहिले.