अधिकाऱ्यांचेच लेडीज बारना अभय

ठाणे महापालिकेचे नवे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरातील बेकायदा लेडीज तसेच अन्य बारविरोधात कारवाई करण्याचे आदेश देऊनही

ठाणे महापालिकेचे नवे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरातील बेकायदा लेडीज तसेच अन्य बारविरोधात कारवाई करण्याचे आदेश देऊनही महापालिकेच्या काही ठरावीक अधिकाऱ्यांना या बारच्या बांधकामांना छुपा पाठिंबा आहे, असा खळबळजनक आरोप सोमवारी झालेल्या स्थायी समिती सभेत सदस्यांनी केला. बारची संपूर्ण माहिती गोळा करा, या मागणीलाही अधिकारी केराची टोपली दाखवत आहेत. आर्थिक हितसंबंधांमुळे बेकायदा बारविरोधात कारवाई होत नसल्याचाही आरोप या वेळी करण्यात आला.
ठाणे शहरातील लेडीज बारविरोधात कारवाई करण्यासाठी ठाणे पोलिसांनी महापालिकेला पत्रव्यवहार केला आणि शहरातील ५३ लेडीज बारची यादी त्यासाठी सुपूर्द केली. या बारचे अनधिकृत बांधकाम, अग्निशमन दलाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’, तळमजला किंवा गच्चीवर सुरू असलेले बेकायदा कामकाज अशा काही मुद्दय़ांवर आधारित ही यादी तयार करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या यादीच्या आधारे महापालिकेने शहरातील लेडीज बारच्या बांधकामाविरोधात कारवाई सुरू केली. त्यापैकी २८ बारचे बांधकाम तोडण्यात आले, तर उर्वरित बारमालक न्यायालयात गेले. त्यापैकी काही बारच्या प्रकरणांत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. न्यायालयाच्या आदेशानंतरही महापालिकेमार्फत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम अद्याप सुरूच आहे. संजीव जयस्वाल यांनी ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारताच शहरातील बेकायदा लेडीज तसेच अन्य बारविरोधात कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. लेडीज तसेच अन्य बारची माहिती संकलित करण्याचे मध्यंतरी आदेश स्थायी समितीने दिले. मात्र, दोन महिने उलटूनही अद्याप माहिती संकलित झालेली नाही. यामुळे सोमवारच्या स्थायी समितीमध्ये सर्वच सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरत महापालिकेच्या कारभारावर टीकास्त्र सोडले. विरोधी पक्षनेता हणमंत जगदाळे यांनी शहरातील किती बेकायदा बारवर कारवाई झाली आणि कारवाई झालेल्या बारची सद्यस्थिती काय आहे, असे प्रश्न विचारले असता, महापालिका उपायुक्त के. डी. निपुर्ते यांनी आतापर्यंत वागळे आणि कळवा या दोन प्रभाग समिती हद्दीतील बारची माहिती संकलित झाली असून उर्वरित बारची माहिती संकलित करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. यामुळे सदस्य आक्रमक झाले आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची भूमिकेवर संशय व्यक्त केला. तसेच महापालिकेच्या कारवाईनंतरही शहरात बार सुरू असल्याचा आरोप नरेश म्हस्के यांनी केला. त्याचप्रमाणे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यास अधिकृत-अनधिकृतची यादी मिळते. मग, पालिकेचे कर्मचारी बारमालकांच्या सोयीची भूमिका घेत असल्याचा आरोप नजिब मुल्ला यांनी केला. दरम्यान, अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब यांनी येत्या तीन दिवसांत बारची माहिती देण्याचे आदेश देत माहिती देण्यास दिरंगाई करणाऱ्या संबंधितांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Thane police officer shows soft corners to ladies bars