मुंबई : एसटी महामंडळाच्या राज्यभरातील बहुसंख्य बसमध्ये गळती होत असून मुसळधार पाऊस आणि आत एसटीच्या छतातून होणारी गळती असे समीकरण जुळले आहे. तसेच परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातही शिवनेरी बसचीही अवस्था बिकट आहे. शिवनेरी ही प्रीमियम बस असून, या बसमधून प्रवास करण्यासाठी जादा पैसे मोजावे लागतात. परंतु, ठाणे – पुणे शिवनेरीत प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. प्रवाशांनी आरडा ओरड केल्यानंतर रबाळ्यात बस बदलण्यात आली.
ठाणे – पुणे मार्गावरील शिवनेरी बसमधून शनिवारी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एसटीच्या दूरवस्थेचा फटका बसला. ठाण्यातील वंदना येथून सकाळी ८ वाजता पुण्याच्या दिशेने निघालेली शिवनेरी बसमध्ये गळती होत असल्याने प्रवासी संतप्त झाले. अखेर प्रवाशांनी आरडाओरड करीत रबाळे येथे बस थांबवली आणि दुसरी बस मागविण्यास भाग पाडले.
ठाणे येथून बस सुटल्यानंतर काही अंतरातवरच बसमधून पाणी गळत असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. बसच्या छतासह विविध भागांतून पाणी येत असल्याने प्रवाशांना जागा बदलण्याची वेळ आली. काही प्रवाशांना सामान आणि स्वतःला पावसाच्या पाण्यापासून वाचवण्यासाठी कसरत करावी लागली. शिवनेरीसारख्या तुलनेने आरामदायी आणि प्रीमियम सेवेतही गळक्या बसचा अनुभव आल्याने प्रवाशांचा संताप अनावर झाला. प्रवाशांनी चालक-वाहकाकडे नाराजी व्यक्त केली. मात्र, बसची अवस्था पाहता प्रवास पुढे सुरू ठेवण्यास प्रवाशांनी विरोध केला. अखेर रबाळे येथे बस थांबविण्यात आली आणि दुसरी बस उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
पावसाळ्यापूर्वी एसटीच्या बसची तपासणी आणि देखभाल केली जात असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातो. मात्र, प्रत्यक्षात शिवनेरीसारखी बस प्रवाशांना घेऊन रस्त्यावर आल्यानंतर गळत असेल, तर देखभाल-दुरुस्तीच्या कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गळती असलेली बस प्रवासी वाहतुकीसाठी रस्त्यावर येईपर्यंत तपासणी यंत्रणा नेमकी काय करत होती, असा सवाल या प्रकारानंतर उपस्थित होत आहे.
एसटीच्या गळतीवर तात्पुरती मलमपट्टी
राज्यभरातील अनेक एसटी बस जुन्या आणि जीर्ण झाल्या आहेत. बसच्या गळतीवर उपाय म्हणून छतावर, एसटीच्या बाजूला जलरोधक चिकटपट्टी लावून तात्पुरती डागडुजी केली जाते. शिवनेरीसारख्या प्रीमियम आणि जास्त भाडे असलेल्या बसची अशी अवस्था आहे. काही शिवनेरी बसची आसने, तुटलेल्या स्थितीत असतात. त्यामुळे एसटी बसमधून प्रवास केल्यास, प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. – रोहित धेंडे, अध्यक्ष, बस फॉर अस फाऊंडेशन
