राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आज मृणालताई गोरे दालनाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगमंत्री सुभाष देसाई व अध्यक्षस्थानी बाबा आढाव यांची उपस्थिती होती. केशव गोरे स्मारक ट्रस्टच्यावीतने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ”मृणालताई गोरे दालन, संघर्षाचा कलात्मक अविष्कार” असं या कार्यक्रमपत्रिकेवर नमूद करण्यात आलेलं होतं.

या कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी मृणालताई गोरे यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. ”महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाता अनेकांनी प्रचंड योगदान दिलं. त्या अनेकांपैकी काहींची आठवण ही प्रकर्षाने आपल्या सगळ्यांना होते, त्यात मृणालताईंचं नाव आल्याशिवाय राहणार नाही.” असं शरद पवार म्हणाले.

तसेच, ”मृणालताई गोरे सदनात असताना अनेकदा वाद व्हायचे पण ते राज्याच्या हिताचे असायचे. सुसंवाद पाहायला मिळायचा, तो सुसंवाद आज पाहायला मिळत नाही. आता कोथळा काढायची भाषा केली जाते.” असं देखील शरद पवारांनी यावेळी बोलून दाखवलं.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यावेळी म्हणाले, ”आज मृणालताईंचं एक दालन सुरू होत आहे ही खरोखरच आपल्या सर्वांसाठी आनंदाची घटना आहे. या दालनामुळे मृणालताई गोरे कोण होत्या, त्यांचं काय कार्य होतं, याची नाही म्हटलं तरी थोडीशी झलक या दालनात बघायला मिळेल. खरंतर मृणालताईंचं सगळं जीवन अशा एका दालनात मांडण मोठं आव्हान आहे, कठीण आहे. आकाशात कडाडणाऱ्या वीजेला हातात पकडण्यासारखं ते आहे, मात्र या सर्वांनी हा प्रयत्न केला. मृणालताईंची कामाची पद्धत अतिशय वेगळी होती. त्यांच्या कामाचा प्रभाव त्या काळातील सर्व विचारसरणीच्या कार्यकर्त्यांवर पडतच होता. म्हणून कळत न कळत कार्यकर्त्यांची एक पिढी नक्कीच मृणालताईंच्या सावलीत वाढली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न हाती घेतले. निवारा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, निराधार महिलांचे प्रश्न हाती घेतले. अशा अनेक विषयांना त्यांनी हात घातला. केवळ रस्त्यावर उतरून चळवळ करणं एवढ्यापुरतं त्यांचं कार्य मर्यादित नव्हतं. तर रचनात्मक काम काहीतरी कार्य उभं करावं, हे देखील त्या करायच्या.”

त्यांना अभिप्रेत काय आहे हे मुख्यमंत्रीच सांगू शकतील – सुभाष देसाई

तर, यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये आजी, माजी व भावी सहकाऱ्यांबद्दलच्या केलेल्या विधानवर प्रतिक्रिया मांडली. ”मुख्यमंत्री बोलल्यांनातर चर्चा होणारच आणि चर्चा झाली तर वावग नाही. जे आमच्याबरोबर येतात ते सहकारीच होतात,  आता त्यात त्यांना अभिप्रेत काय आहे हे मुख्यमंत्रीच सांगू शकतील. त्यातून आणखी अर्थ शोधण्याची गरज नाही. आजकालच्या राजकारणाला जे विकृत रूप येत जातंय त्यांतून त्यांनी एक उपाययोजना सुचवली आहे, समान उद्दिष्टासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. पण, मला नाही वाटत की एकत्र येऊ, राजकीय नाहीच. तो विषयच नाही. राज्यसरकार ५ वर्षांचा कालावधी पूर्ण करणार”, असं सुभाष देसाईंनी बोलून दाखवलं.

Story img Loader