उमाकांत देशपांडे
मुंबई : मुंबई महापालिकेच्या ५०-६० शाळांमध्ये मातृभाषेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गणित आणि विज्ञान विषयांचा खेळखंडोबा झाला आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन अडीच महिने उलटल्यावर नववीच्या विद्यार्थ्यांना आता गणित-विज्ञान हे विषय सेमीइंग्रजीतून शिकविले जाणार असून त्याची पाठय़पुस्तकेही पुरविली जाणार आहेत.
विद्यार्थ्यांनी मातृभाषेत शिक्षण घ्यावे, हे शासनाचे धोरण आहे. मुंबई महापालिकेच्या मराठी, उर्दू, तमिळ, इंग्रजी अशा विविध माध्यमांच्या शाळा आहेत. मराठी माध्यमाच्या पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणित सेमी इंग्रजीतून आणि अन्य विषय मातृभाषेत शिकवले जातात. तसेच सहावी ते आठवीला गणित आणि विज्ञान सेमी इंग्रजीतून, तर नववी-दहावीसाठी पुन्हा हे दोन्ही विषय मातृभाषेत शिकविले जातात.
हेही वाचा >>>भूमिगत कचरापेटय़ांसाठी पुन्हा जागेचा शोध; योजना अपयशी ठरल्यानंतरही मुंबई महापालिकेचा अट्टहास
शिक्षणाचे माध्यम बदलत असल्याने हजारो विद्यार्थ्यांचा गोंधळ होऊन त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होत असल्याची तक्रार आहे. महापालिका शाळांमध्ये गणित आणि विज्ञान हे विषय सेमी इंग्रजीतून शिकविण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता असलेले शिक्षकच उपलब्ध नाहीत. यामुळे शिक्षण खात्याची मोठी अडचण झाली आहे.
हेही वाचा >>>धारावी पुनर्विकासाची किनार की पक्षांतर्गत नाराजी? काँग्रेसच्या चार माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश
भाजपच्या धारावी विधानसभा निवडणूकप्रमुख दिव्या ढोले यांनी धारावीतील पालिकेच्या ११ शाळांना भेटी देऊन यासंदर्भातील अडचणी सहआयुक्त गंगाधरन यांच्या निदर्शनास आणल्या. सहावीपासून गणित, विज्ञान हे विषय सेमी इंग्रजीतून शिकविण्यास सुरुवात केल्यावर ते दहावीपर्यंत त्याच पद्धतीने शिकविले जावेत. महाविद्यालयीन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होईल, अशी मागणी पालिकेकडे केल्याचे ढोले यांनी सांगितले. त्यामुळे पालिकेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी तातडीने यंदापासूनच हे विषय सेमीइंग्रजीतून शिकविण्याचे आदेश २५ ऑगस्टला जारी केले.
हेही वाचा >>>‘इंडिया’च्या मानचिन्हाचे गुरुवारी अनावरण; दोन दिवसांच्या बैठकीत समन्वयावर चर्चा
शालेय शिक्षणमंत्र्यांची भूमिका
गणित आणि विज्ञान हे विषय सेमी इंग्रजीतून शिकविण्याचा निर्णय १८ ऑगस्ट २०२२ रोजी घेण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी १०६ शाळांमध्ये झाली आहे, मात्र धारावीसह ५० ते ६० शाळांचा प्रश्न असल्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. आता अचानक हे दोन्ही विषय सेमी इंग्रजीतून शिकविले गेल्यास गोंधळ उडेल. त्यामुळे यंदा नववीच्या आणि पुढील वर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांना ते सेमी इंग्रजीतून शिकविले जातील, असे ते म्हणाले.