मुंबई : वडाळ्यातून अपहरण झालेल्या मुलाचे शीर धडापासून वेगळे करून निर्घृणपणे हत्या करून मृतदेह शांतीनगर जवळील खाडीपट्ट्यात फेकण्यात आल्याची घटना जानेवारी महिन्यात घडली होती. याप्रकरणातील आरोपीला वडाळा टीटी पोलिसांंनी अटक केली आहे.वडाळा पूर्व येथील शांतीनगर परिसरात राहणाऱ्या ४९ वर्षीय तक्रारदाराचा मासे विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचा १२ वर्षांचा मुलगा येथील एका शाळेत इयत्ता सहावीत शिकत होता. शाळेला सुट्टी असल्याने २८ जानेवारी रोजी तो घरीच होता. रात्री सव्वाआठच्या सुमारास बाहेर फिरायला जातो असे सांगून घराबाहेर पडलेला मुलगा घरी परतलाच नाही. सर्वत्र शोधूनही तो सापडला नाही. अखेर वडिलांनी वडाळा टी. टी. पोलीस ठाणे गाठून मुलगा हरविल्याची तक्रार केली.

त्यानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी शांतीनगर परिसरात केलेल्या चौकशीत येथील एका मुलाने सदर मुलगा याच परिसरात राहणाऱ्या बिपुल शिकारीसोबत जाताना बघितल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणाची पडताळणी केली. हा मुलगा शिकारी याच्यासोबत जाताना येथील एका सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणात दिसत होते. त्यानुसार, पोलिसांनी संशयित आरोपी शिकारीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पण तेथून त्याने पलायन केले होते. त्याला दिल्ली पोलिसांनी दिल्लीतून ताब्यात घेतले आहे. त्यानंतर वडाळा टीटी पोलिसांनी त्याला अटक केली.मुळचा कोलकाता येथील रहिवासी असलेला संशयित आरोपी बिपुल शिकारीविरोधात यापूर्वी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याने पत्नीची हत्या केली होती. गुन्ह्यात अटक होऊन कारागृहात असलेला शिकारी हा संचीत रजेवर बाहेर पडल्यानंतर मुंबईत पळून आला होता.