The accused who stole from a private office was arrested mumbai | Loksatta

मुंबई: खासगी कार्यालयातील चोरी करणाऱ्या आरोपीस अटक

चोरीनंतर आरोपी पळून गेला होता. पोलिसांनी शोध घेत आरोपीला अटक केली आहे.

मुंबई: खासगी कार्यालयातील चोरी करणाऱ्या आरोपीस अटक
प्रातिनिधिक छायाचित्र /लोकसत्ता

अंधेरी येथील एका खासगी कार्यालयात झालेल्या सुमारे चार लाख रुपयांच्या चोरीप्रकरणी कैलास चिंधू पानमंद याला काही तासांतच अटक करण्यात वर्सोवा पोलिसांना यश आले आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्याच्या दृष्टीने चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा- मुंबईतील मालाडध्ये सर्वाधिक १८ तलाव

नंदकुमार परमानंद मिराणी हे ६५ वर्षांचे व्यावसायिक जोगेश्वरी परिसरात राहतात. अंधेरीतील लोखंडवाला सर्कल येथील सनशाईन अपार्टमेंटमध्ये त्यांचे कार्यालय आहे. तिथे ते कायदाविषयक सल्ला देण्याचे काम करतात. गेल्या आठवड्यात त्यांच्या मुलीने त्यांना एक लाख रुपये आणि एका ग्राहकाने ५० हजार रुपये दिले होते. ही रक्कम त्यांनी त्यांच्या तिजोरीत ठेवली होती. शनिवार, २६ नोव्हेंबरला त्यांना पैशांची गरज होती. त्यामुळे त्यांनी पैसे घेण्यासाठी तिजोरी उघडली. तिजोरीत रोख दीड लाख रुपये आणि अडीच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सुमारे चार लाख रुपयांच्या मुद्देमालाची चोरी झाली होती. ही बाब लक्षात येताच त्यांनी सोमवारी वर्सोवा पोलिसांत तक्रार केली. याप्रकरणी चोरीचा गुन्हा नोंद होताच पळून गेलेल्या कैलास पानमंद या संशयिताला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यानेच ही चोरी केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 15:19 IST
Next Story
राणा दाम्पत्याच्या नावे वॉरंट