गेल्या दीड वर्षांंपासून अडगळीत पडलेली बहुप्रतीक्षीत वातानुकूलित डबल डेकर अखेर रविवारी कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस या एसी डबलडेकर एक्सप्रेसला ६ डिसेंबरला हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवात एसी डबलडेकर चालविण्यात आली होती. मात्र तिकीटांचे अव्वाच्यासव्वा वाढणारे दर यामुळे चाकरमान्यांनी या गाडीकडे पाठ फिरवली होती. यानंतर
ही गाडी अयशस्वी झाल्याने तिला दक्षिणेकडे पाठवण्याचा घाट रेल्वेच्या अधिकाऱ्याने घेतला होता. लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव एसी डबलडेकर एक्सप्रेस आठवडय़ातील सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता सुटणार असून मडगावला सायंकाळी साडेपाच वाजता पोहचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी दर मंगळवारी, गुरुवारी अणि शनिवारी सकाळी सहा वाजता सुटणार आहे.