मुंबईतील हवेचा दर्जा खालावला असून वाढत्या प्रदूषणावर तोडगा काढण्यासाठी सात सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने सात दिवसांत अहवाल सादर करावा, असे निर्देश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. या ‘धूळमुक्त मुंबई’साठीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी १ एप्रिलपासून करण्यात येणार आहे.
मुंबईत गेल्या तीन-चार महिन्यांपासून प्रदूषण वाढले आहे. दिल्लीपेक्षा येथील हवा बिघडली आहे. त्यामुळे पालिकेने नक्की कोणत्या उपाययोजना केल्या याबाबत सर्व स्तरातून विचारणा होऊ लागली आहे. प्रदूषणावर तोडगा काढण्यासाठी सात धोरणे पालिका आयुक्तांनी अर्थसंकल्पात मांडली आहेत. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी येत्या १ एप्रिलपासून करण्यात येणार आहे.
मुंबई महानगरासह मुंबई प्रदेशात मोठय़ा प्रमाणावर होत असलेली विकास कामे, बांधकामे यासह हवेतील बदलामुळे हवेचा गुणवत्ता स्तर सध्या खालावला आहे. प्रदूषणासाठी धूळ हा घटक प्रामुख्याने कारणीभूत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. समितीने सात दिवसांत अहवाल सादर करावा आणि त्या आधारे दिनांक १ एप्रिल २०२३ पासून उपाययोजनांची तातडीने सक्त अंमलबजावणी सुरू करण्यात येईल, त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर बांधकाम रोखण्यासह इतर कठोर कारवाई केली जाईल, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी दिले.
सात जणांच्या समितीमध्ये उपआयुक्त (पर्यावरण), उपआयुक्त (पायाभूत सुविधा), उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन), प्रमुख अभियंता (विकास नियोजन), महानगरपालिका आयुक्त कार्यालयाचे प्रतिनिधी, कार्यकारी अभियंता सतीश गीते आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नामनिर्देशित सदस्य अशा सहा जणांचा देखील समावेश करण्यात आला आहे.
मुंबईतील हवा प्रदूषण, मुंबई सुशोभीकरण प्रकल्प आणि मार्च २०२३ अखेर मुंबईत होणारी जी२० परिषदेची बैठक या पाश्र्वभूमीवर महानगरपालिका आयुक्तांनी रविवारी आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. या बैठकीला पालिकेचे सर्व अतिरिक्त आयुक्त आणि अधिकारी उपस्थित होते.
पाच हजारांहून अधिक बांधकामे..
मुंबई महानगरात यापूर्वी कधीही नव्हती, अशी हवा प्रदूषण स्थिती निर्माण झाली आहे. कोविड पश्चात कालावधीत मोठय़ा प्रमाणावर सुरू झालेली बांधकामे तसेच विविध विकास कामे यातून निर्माण होणारी धूळ, त्याच्या सोबतीला हवेच्या स्थितीमध्ये आणि वेगामध्ये झालेले बदल हे दोन प्रमुख घटक आढळले आहेत. मुंबईत सद्य:स्थितीत सुमारे ५ हजारांपेक्षा अधिक ठिकाणी विविध कामे सुरू आहेत. त्यामुळे या विविध बांधकामे आणि विकास कामांच्या ठिकाणाहून निर्माण होणारी धूळ नियंत्रित करण्यासाठीच्या उपाययोजना, सर्व संबंधित भागधारकांना त्याविषयी सूचना देऊन उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची पद्धती आणि उपाययोजना, नियम व सूचना यांचे उल्लंघन केल्यास करावयाची कठोर कारवाई या तीन पैलूंवर सात दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.