मुंबई: मृत पाळीव तसेच रस्त्यावरील मोकाट प्राण्यांच्या कलेवराचे दहन करण्यासाठी देवनार पशुवधगृहात प्राण्यांची दहनवाहिनी उभारण्याचे काम रखडले असून मार्चपर्यंत दहनवाहिनीचे काम पूर्ण करण्याचे पालिकेचे नियोजन फसले आहे. मात्र, दहनवाहिनीला जोडण्यात येणाऱ्या वायुवाहिनीचे काम रखडल्यामुळे प्राण्यांच्या दहनवाहिनीसाठी प्राणीप्रेमींना आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. महानगरपालिका प्रशासनाने मालाड येथे १५ सप्टेंबर २०२३ रोजी मृत पाळीव, तसेच रस्त्यावरील मोकाट प्राण्यांच्या कलेवराचे दहन करण्यासाठी नैसर्गिक वायूवर आधारित दहनवाहिनी सुरू केली.

प्राण्यांच्या या दहनवाहिनीला नागरिक आणि प्राणीप्रेमींचा प्रतिसाद मिळत असल्याचे लक्षात घेऊन देवनार पशुवधगृहातही दहन वाहिनीची सुविधा उपलब्ध करून देण्याचा पालिकेने निर्णय घेतला. त्यानुसार देवनार पशुवधगृहात प्राण्यांसाठी दहनवाहिनी उभारण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर देवनार पशुवधगृहाच्या आधुनिकीकरणाचा ‘टप्पा – १ अ’मधील कामे पूर्ण झाली असून ‘टप्पा १ ब’मधील कामे प्रगतीपथावर आहेत. त्याअंतर्गत पालिकेने पशुवधगृहात विविध कामे हाती घेतली आहेत.

मालाड येथील दहनवाहिनीत शहर आणि पश्चिम उपनगरांतील अनेक प्राण्यांचा दहनविधी करण्यात येतो. पूर्व उपनगरातही ही सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने देवनारमध्ये प्राण्यांची दहनवाहिनी उभारण्यात येत आहे. त्या दहनवहिनीला महानगर गॅसतर्फे वायुपुरवठा केला जाणार असून दहनवाहिनीचे काम गतवर्षीच पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, अनेक महिन्यांपासून वायूवाहिनीचे काम तांत्रिक अडचणींमुळे अडकले आहे. तसेच, आता पावसाळा तोंडावर आल्यामुळे हे काम आणखी धीम्या गतीने होण्याची शक्यता आहे. परिणामी, नागरिकांना या सेवेसाठी आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.

दहनवाहिनीची क्षमता ५० किलो असून एकाच वेळी १० ते १२ किलो वजनाच्या पाच प्रण्यांवर दहनविधी करता येणार आहे. ही व्यवस्था पर्यावरण पूरक म्हणजेच पीएनजीवर आधारित असल्याने कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही, असा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे.वायुवाहिनीच्या जोडणीचे काम विविध रखडले असून दहनवाहिनीचे ऑगस्टपर्यंत सुरु करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे पालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देवनार पशुवधगृहात दहनवाहिनी सुरूसोबतच अन्य कामेही सुरू आहेत. पशुवधगृहातील प्रशासकीय इमारत व शेळ्या, मेंढ्यांच्या कत्तलखान्याच्या इमारतींची संरचनात्मक दुरुस्ती करण्यात येत आहे. तसेच, तेथील गुराढोरांचा गोठा व पंपरूम आणि एस – १ वाड्याचीही संरचनात्मक दुरुस्ती करण्यात येत आहे. ही सर्वच कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी कामांना वेग देण्यात आला आहे.