आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात सॅम डिसुझा हा महत्वाचा दुवा असल्याचं समोर आलं होतं. सॅम डिसुझा याने सुनील पाटील याच नाव घेतलं व त्यानंतर आता विजय पगारे या व्यक्तीचं नाव समोर आलं. तर, आर्यन खान ड्रग्ज प्रकरण हे घडवून आणलं गेलं, असं सुनील पगारे यांनी म्हटलं आहे.

”किरण गोसावीने ५० लाख घेतले होते, काही रक्कम अधिकाऱ्यांना मिळणार होती. सुनील पाटील हे समीर वानखेडेच्या संपर्कात होते, माझ्यासमोर बोलणं व्हायचं. आर्यन खानला फसवल जात असल्याचं मला ३ ऑक्टोबरला लक्षात आलं. या प्रकरणात खंडणी घेण्यात आली होती व अधिकारी वर्गाचा देखील समावेश असण्याची दाट शक्यता आहे.” असा दावा देखील विजय पगारे यांनी एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत केला आहे.

तसेच विजय पगारे यांनी हे देखील सांगितले की, ”किरण गोसावी व भानुशाली हे त्या दिवशी सतत टीव्हीवर दिसत होते. सुनील पाटील याने मला फोनवर सांगितलं होतं की, किरण गोसावीच्या मस्तीमुळे एक सेल्फी आपल्याला १८ कोटी रुपयांना पडला. त्याच्या मस्तीमुळे सगळा पैसा परत गेला. नंतर मला समजलं की आर्यन खानला या प्रकरणात फसवलं जात आहे. म्हणून मी किल्ला कोर्टात पोहचलो तिथे आर्यनला आणलं गेलं होतं. तिथे सतीश शिंदेयांना भेटून त्यांना माहिती दिली परंतु त्यांनी विश्वास ठेवला नाही.”

विजय पगारे म्हणाले, ”मी सुनील पाटील यांना ३५ लाख रुपये दिलेले होते. त्यामध्ये माझे २० लाख आहेत व माझे ठाण्याचे मित्र जितेंद्र बंगाडे यांचे १५ लाख रुपये आहेत. त्यांनी मला आश्वासन दिलं होतं की रेल्वे बोर्डात तुम्हाला काहीतरी काम काढून देऊ. सुनील पाटीलचे अनेक राजकीय लोकांशी संबंध आहेत. आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांसोबत देखील नेहमी त्याचा संवाद असतो. त्यामुळे मी त्याच्यासोबत सावलीप्रमाणे होतो. २७ सप्टेंबर रोजी माझ्या नावाने वाशीमध्ये फॉर्चुन हॉटेलमध्ये एक रूम व अन्य एक रुम किरण गोसावीच्या नावाने बुक करण्यात आली होती. किरण गोसावीच्या रूम मध्ये जेव्हा मी, सुनील पाटील व किरण गोसावी होतो. त्या दिवशी संध्याकाळी मनिष भानुशाली हा एका मुलीला घेऊन, दारूच्या नशेत आला होता. त्यानंतर ते माझ्या रूममध्ये दोन ते तीन तास थांबले.

नंतर ते आमच्या रूममध्ये आले. नंतर ते सुनीलला म्हणाले की लवकर तयार हो, आपल्या हाती मोठा गेम लागला आहे. नानाचे देखील पैसे आपण या दोन-तीन दिवसात देवून टाकू. मी सकाळी विमानाने अहमदाबादला जातो, तुम्ही आताच्या आता अहमदाबादसाठी निघा, अशी त्यांची माझ्या समोर चर्चा झाली. मग किरण गोसावी व सुनील पाटील हे अहमदाबासाठी निघाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी व पुढे मी पैशांसाठी सुनील पाटीलच्या संपर्कात होतो. पण तो देतो-देतो असं म्हणत होता. त्यानंतर माझ्या रूमवर प्रभाकर साईल आला होता. नंतर तो निघून गेला त्याच्या दुसऱ्या दिवशी माझा फोन कुणीच घेतला नाही व कुणाचाही फोन देखील लागत नव्हता.”