मुंबई: मुंबई : मध्य रेल्वेवरील कळवा-मुंब्रा स्थानकांदरम्यान मंगळवारी सकाळी जलद लोकलची जोरदार धडक लागून एका म्हैशीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे मध्य रेल्वेच्या लोकल सेवेवर परिणाम झाला. लोकल २० ते ३० मिनिटे विलंबाने धावत होत्या.
कळवा – मुंब्रा रेल्वे स्थानकांदम्यान डाऊन जलद मार्गावर मंगळवारी सकाळी १०.०६ च्या सुमारास लोकलची एका म्हैशीला धडक बसली. म्हैस लोकलच्या चाकाखाली आल्याने लोकल सेवा खोळंबली. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी दुर्घटनास्थळी दाखल झाले. ही लोकल सुमारे एक तास खोळंबली होती. दरम्यान, मृत म्हैशीला बाहेर काढून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.
या अपघातानंतर ठाण्यापुढील कल्याणच्या दिशेला जलद मार्गे येणाऱ्या सर्व लोकल डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या. त्यामुळे लोकल प्रचंड विलंबाने धावत होत्या. डाऊन लोकल सेवा विस्कळीत झाल्याने, त्याचे परिणाम अप लोकल सेवेवरही झाले. सकाळी ११.०८ च्या सुमारास दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आणि डाऊन जलद मार्गावरून लोकल सुरू करण्यात आल्या. परंतु, लोकल दुपारपर्यंत विलंबाने धावत होत्या.
अप धीम्या लोकल जलद मार्गावरून मार्गस्थ झाल्या. त्यामुळे धीम्या मार्गावर लोकल सेवा उपलब्ध नव्हती. म्हैस रुळांवर भरकटली होती आणि तिला डाऊन जलद लोकलने धडक दिली. धडकेमुळे तिचा जागीच मृत्यू झाला आणि ती लोकल चाकाखाली अडकली. त्यामुळे डाऊन जलद मार्गावरील सेवा खोळंबली.
भविष्यात असे अवघात टाळण्यासाठी जनावरांना रेल्वे रुळांजवळ आणू नये, असे आवाहन मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केले. या प्रकरणात अधिक तपास मुंब्रा येथील रेल्वे सुरक्षा बल करीत आहे. मध्य रेल्वेच्या परिसरात जनावरे चरण्यासाठी येतात. कल्याण – ठाकुर्लीदरम्यान कायम जनावरे दिसतात. त्यामुळे लोकल प्रवास धोकादायक होऊ लागला आहे, असे प्रवाशांनी सांगितले.