भारतीय नौदलाची शान राहिलेल्या आणि सध्या सेवेतून निवृत्त झालेल्या विमानवाहून युद्धनौका ‘आयएनएस विराट’चे वस्तुसंग्रहालयात रुपांतर करण्यास मंत्रिमंडळाने गुरुवारी हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे भारताचा हा अभिमानास्पद आणि ऐतिहासीक ठेवा सर्वसामान्यांना पाहण्यासाठी खुला होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर इतरही अनेक महत्वाचे निर्णय यावेळी घेण्यात आले.

केंद्र शासनाने सुरू केलेली ‘खेलो इंडिया’ योजनेची २०१८-१९ पासून अंमलबजावणी करण्यासही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्यातील शासकीय जमिनीवर क्रीडांगण किंवा खेळाचे मैदान, व्यायामशाळा यांच्या भाडेपट्ट्याच्या नुतनीकरणाबाबतचे धोरणही निश्चित करण्यात आले आहे.

शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेद महाविद्यालये आणि रुग्णालयांची बांधकामे आता केंद्र शासनाच्या अधिपत्याखालील सार्वजनिक कंपन्यांकडून करुन घेता येणार. यामध्ये २५ कोटी व त्यापेक्षा जास्त अंदाजपत्रकीय किंमतीच्या कामांचाही समावेश करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच शासकीय प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळांच्या श्रेणीवाढ करण्याबरोबरच संलग्न माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचे वर्ग सुरू करण्यासह आवश्यक पदनिर्मिती व अनुषंगिक खर्चालाही यावेळी मान्यता देण्यात आली.

अनुदानित प्राथमिक आश्रमशाळांना श्रेणीवाढ करुन माध्यमिक आश्रमशाळा करणे व माध्यमिक आश्रमशाळांना श्रेणीवाढ करून कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यासाठी लागणाऱ्या पदनिर्मिती व त्यासाठी लागणाऱ्या खर्चाला मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच जवाहर नवोदय विद्यालयाच्या स्थापनेसाठी भंडारा जिल्ह्यातील मौजा पाचगाव (ता. मोहाडी) येथील ८.८० हेक्टर शासकीय जमीन नाममात्र भाड्याने ३० वर्षांसाठी देण्यास मंजूरी देण्यात आली.