अभिषेक तेली

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांच्या लढाईने एकीकडे तीव्र स्वरुप धारण केलेले असताना दुसरीकडे घरोघरी दररोज दूरचित्रवाहिनीच्या रिमोटवरून रंगणाऱ्या संघर्षांची धग मात्र काहीशी कमी झाली आहे. ‘झी’, ‘स्टार’, ‘सोनी’ अशा प्रमुख प्रसारकांनी (ब्रॉडकास्टर्स) वाहिन्यांच्या शुल्कात केलेली वाढ अमान्य करत काही केबल कंपन्यांनी संप पुकारला आहे. त्याविरोधात प्रसारकांनी शुल्कवाढ अमान्य करणाऱ्या केबल आणि डीटीएच सेवा पुरवठादारांकडील आपल्या वाहिन्यांचे प्रक्षेपणच गेल्या दोन-तीन दिवसांपासून बंद केले आहे. प्रसारक आणि एमएसओ (मल्टिपल सिस्टम ऑपरेटर्स) यांच्या या भांडणात आपल्या आवडीच्या मालिका पाहता येत नसल्याने प्रेक्षकांचे प्राण तळमळले आहेत. ट्रायने केलेल्या नव्या दरवाढीनुसार ‘झी’, ‘स्टार’, ‘सोनी’ यासारख्या प्रमुख समूहांनी आपल्या वाहिन्यांच्या शुल्कात वाढ केली असून त्यासंदर्भातील नोटिस एमएसओना पाठवण्यात आली आहे.

मात्र वाहिन्यांनी सुचवलेली शुल्कवाढ मान्य केल्यास ग्राहकांना केबलकडून मिळणाऱ्या त्यांच्या नेहमीच्या पॅकेजसाठी करावा लागणारा खर्चाचा आकडा अधिक वाढणार आहे. त्यामुळे काही केबल कंपनी आणि डीटीएच सेवा पुरवठादारांनी या शुल्कवाढी विरोधात संप पुकारला आहे. अखिल भारतीय डिजिटल केबल संघाचे (एआयडीसीएफ) सर्व सदस्य आणि हॅथवे, डेन, जीटीपीएल, इन मुंबई या कंपन्यांनी शुल्कवाढ करण्यास नकार दिला असल्याने त्यांच्याकडील ग्राहकांच्या दूरचित्रवाणी संचावरून आवडत्या वाहिन्यांचे प्रसारण बंद करण्यात आले आहे. आपल्या आवडत्या मालिकांचे भाग, चित्रपट पाहता येत नसल्यामुळे प्रेक्षकांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. करमणूकीचे एकमेव साधन असलेल्या मनोरंजन वाहिन्यांचे प्रसारण थांबल्याने ज्येष्ठ नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक हे अंथरुणाला खिळून असल्याने वा एकटे राहत असल्याने मालिका हेच त्यांचे विरंगुळय़ाचे महत्वाचे साधन असते. ‘मालिका हा आमच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाल्या आहेत. आता वाहिन्याच बंद असल्यामुळे घरात एकच शांतता पसरली आहे. या शांततेची सवय नसल्याने कंटाळा आला आहे. सध्या पुस्तक वाचनामध्ये रमावे लागत आहे’, असे लोअर परळ येथील रहिवाशी भारती कदम यांनी सांगितले. तर सध्या सर्व वाहिन्या बंद असल्यामुळे आम्हा गृहिणींना प्रचंड कंटाळा आला आहे. आम्ही घरातील सर्व कामे करत मालिका पाहतो. त्यामुळे काम करताना थकवाही जाणवत नाही. लवकरात लवकर वाहिन्या सुरू करा, अशी मागणी करणाऱ्या वृषाली गिमोणकर शुल्कवाढीला मात्र विरोध केला. ‘सध्या राज्यात सत्तासंघर्षांचे उमटणारे पडसाद, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन, बारावी परीक्षेच्या संदर्भातील बातम्या आदी ताज्या घडामोडी या वृत्तवाहिन्यांमधून कळतात.