चंद्रकांत पाटील यांची टीका

मुंबई : स्वत:ला महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणवून घेणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जनतेच्या वेदनेचा आवाजच ऐकू येत नसल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी केली.

राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढत असून साकीनाका आणि डोंबिवली सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. कल्याणमध्ये एका आठ वर्षाच्या मुलीवर अत्याचार व महाबळेश्वारमध्येही एका मुलीवर बलात्काराची घटना उजेडात आली आहे. या घटनांवरून राज्य सरकारला भाजपने धारेवर धरले आहे. यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, ही वेळ गायब होण्याची नाही, असे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना माझे एकच सांगणे आहे. अत्याचाराचे हे दुष्टचक्र थांबवण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे.

बलात्काऱ्यांना राजाश्रय

महाविकास आघाडी सरकारकडून बलात्काऱ्यांना राजाश्रय देण्याचे काम सुरू असल्याचा आरोप भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला.

कुठल्याच प्रश्नावर सरकारमध्ये एकी नाही, मात्र बलात्काऱ्यांना वाचविण्यासाठी ते सर्व एकत्र येतात. डोंबिवलीच्या घटनेने राज्य हादरून गेले आहे. राज्यात रोज कुठे ना कुठे अत्याचाराचे सत्र सुरू आहे.  शिवसेनेचे नेते संजय राठोड यांच्यावर अद्याप मनुष्यवधाचा गुन्हा दाखल नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेहबूब शेखवरही काहीही कारवाई होत नाही असा आरोप त्यांनी केला.