साताऱ्यातून पुन्हा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आपण इच्छूक असल्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे. मात्र, या मतदारसंघात सध्या उदयनराजे यांच्याविरोधात वातावरण असल्याचे चित्र आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून इथली उमेदवारी नक्की कोणाला मिळते याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, पवारसाहेब जो निर्णय घेतील तो मान्य असेल असेही उद्यनराजे स्पष्ट केले आहे. मात्र, इतर पक्षात आपले मित्र असल्याचे सांगत राष्ट्रवादीला सूचक इशाराही त्यांनी दिला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मतदारसंघनिहाय आढावा बैठक सुरु आहे. या बैठकीला उदयनराजे भोसले यांनी हजेरी लावली. दरम्यान, ट्रॅफिकमध्ये अडकल्याने या बैठकीसाठी राष्ट्रवादीच्या मुख्यालयात पोहोचायला त्यांना उशीर झाला.

दरम्यान, माध्यमांशी संवाद साधताना उदयनराजे म्हणाले, बैठकीत मी शरद पवारांचे आशिर्वाद घेतले. लोकसभेच्या उमेदवारीसाठी मी इच्छूक आहे. स्थानिक पातळीवरुन मला विरोध नाही. मात्र, पवारसाहेब जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल. दरम्यान, सर्वच पक्षात आपले मित्र असल्याचे सांगत, जर आपल्याला राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली नाही. तर इतर पक्षाची दारेही आपल्याला खुली असल्याचा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे.

राष्ट्रवादीत सध्या उदयनराजे विरोधी वातावरण असल्याचे सुत्रांकडून कळते. त्यामुळे स्थानिक नेते उदयनराजेंचेच नाव सूचवतात की दुसऱ्या उमेदवाराचे हे लवकरच स्पष्ट होईल. दरम्यान, साताऱ्यातून लोकसभेसाठी माजी सनदी अधिकारी श्रीनिवास पाटील यांच्या नावाचीही चर्चा असल्याचे कळते. मात्र, बैठकीनंतरच साताऱ्यातील उमेदवारी स्पष्ट होईल.