मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पसंतीचा वाहन क्रमांक आपल्या वाहनालाही असावा या हेतूनेच या वाहन क्रमांकाला मागणी वाढली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या पसंतीचा ५६७ हा क्रमांक त्यांच्या वाहनावर अनेक वर्षे असतो. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यावरही ते स्वत:च्या खासगी वाहनातून मुंबई-ठाण्यात प्रवास करतात. हा क्रमांक आपल्या वाहनावरही असावा, अशी काही जणांची इच्छा असावी. याचे प्रत्यंतर गेल्याच आठवडय़ात ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात आले.

वाहनांच्या नव्या सीरिजमध्ये ५६७ क्रमांकाकरिता लिलाव पद्धतीत लेखी अर्ज आले होते. त्यात ३० हजारांपासून ते ७० हजारांपर्यंत लिलावाची रक्कम पुकारली होती. सर्वाधिक ७० हजारांची रक्कम देण्याची तयारी दर्शविलेला हा क्रमांक देण्यात आला आहे. साधारणपणे चांगल्या (उदा. ४४४४, ९९९९) क्रमांकांसाठी अधिक मागणी असते. पण मुख्यमंत्र्यांचा पसंती क्रमांक असल्याने त्याला मागणी वाढल्याचा अनुभव परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना आला. यापूर्वी या क्रमांकाला कधीच मागणी नसायची असेही सांगण्यात आले. तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा २३४५ हा वाहनांसाठी पसंती क्रमांक आहे. यामुळे चेन्नई किंवा विजयवाडय़ात या क्रमांकाला अधिक मागणी असते, असेही परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.