मुंबई : आंबेडकरी चळवळीतील विचारवंत व मानवी हक्क कार्यकर्ते प्रा. आनंद तेलतुंबडे यांच्या कारागृहातील अनुभवांवर लिहिलेल्या पुस्तकावरील काळाघोडा महोत्सवात होणारी नियोजित चर्चा मुंबई पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे आयोजकांना ऐनवेळी रद्द करावी लागली. हे चर्चासत्र रद्द करण्यासाठी समाजमाध्यमांवर उजव्या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोहीम चालवली होती.

डेव्हिड ससून ग्रंथालयात गुरुवारी संध्याकाळी हे चर्चासत्र होणार होते. ‘इनकार्सरेटेड : टेल्स फ्रॉम बिहाइंड बार्स’ असे या चर्चासत्राचे नाव होते. यामध्ये पुस्तकाचे लेखक प्रा. आनंद तेलतुंबडे यांच्याशी पत्रकार, लेखिका नीता कोल्हटकर संवाद साधणार होत्या. चर्चासत्राचे सूत्रसंचलन ‘स्क्रोल’चे संपादक नरेश फर्नांडिस करणार होते. दरम्यान, आयोजकांनी मंगळवारी रात्री चर्चासत्रात सहभागी होणाऱ्या वक्त्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे चर्चासत्र रद्द करण्यात आल्याचे कळविले आहे.

‘द सेल अँड द सोल: अ प्रिझन मेमोअर’ हे प्रा. आनंद तेलतुंबडे यांनी कारागृहातील अनुभवांवर लिहिलेले पुस्तक आहे, ज्यामध्ये त्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणात १० व्या क्रमांकाचे आरोपी म्हणून ३१ महिन्यांच्या तुरुंगवासाचे दस्तऐवजीकरण केले आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये हे पुस्तक प्रकाशित झाले. तेलतुंबडे यांना एप्रिल २०२० मध्ये पुण्यातील ‘एल्गार परिषद’ प्रकरणात अटक झाली. नोव्हेंबर २०२२ मध्ये मुंबई उच्च न्ययालयाने त्यांना जामीन मंजूर केला.

प्रा. तेलतुंबडे यांचा सहभाग असलेल्या चर्चासत्राविषयी समाज माध्यमांवर काही उजव्या गटाच्या कार्यकर्त्यांनी मोहीम चालवली होती. देशद्रोहाचा आरोप असलेल्या गुन्हेगाराला काळा घोडा महोत्सवात स्थान देऊ नये, अशी मागणी करण्यात आली होती. शेवटी पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे महोत्सवाच्या आयोजकांनी चर्चासत्र रद्द केले. काळा घोडा कला महोत्सवाचे यंदा २६वे वर्ष आहे. मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र पर्यटन विभाग आणि युनेस्को, महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई वाहतूक पोलीस यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

‘दि सेल ॲण्ड दि सोल : ए प्रिजन मेमॉयर’ या पुस्तकात भारतातील कारागृह व्यवस्थेतील क्रूर वास्तव आणि कारागृहातील कैद्यांच्या दुर्दशेचा पर्दाफाश केला आहे. हे पुस्तक गेल्या वर्षी प्रकशित झाले होते. या पुस्तकावर अनेक ठिकाणी जाहीर चर्चा झाल्या. अनेक संशोधन पत्रिकांमध्ये परीक्षणे प्रसिद्ध झाली आहेत. या पुस्तकावर बंदी नाही. पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध आहे. तरी अशा पद्धतीने कार्यक्रम रद्द करण्यास भाग पाडणे याचा अर्थ इथे कायद्याचे राज्य नाही. – प्रा. आनंद तेलतुंबडे