महापालिकेची महासभा सुरु असताना प्रेक्षक गॅलरीमध्ये चहा न मिळाल्यामुळे चक्क प्रहार संघटनेच्या मिरा-भाईंदर जिल्हाध्यक्षाने सभागृहात घुसून महापौरांचा विरोध केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे आयुक्तांच्या आदेशानुसार भाईंदर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. आज (सोमवार) सकाळी ११ वाजता मिरा-भाईंदर महानगरपालिकेची सर्वसाधारण महासभा भरवण्यात आली होती. या महासभेत महत्वाचे विषय असल्यामुळे सतत तीन तास ब्रेक न घेता चर्चा सुरु होती. अशा परिस्थितीत दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास प्रहार संघटनेचे मिरा-भाईंदरचे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास निकम हे महासभा सभागृहात आले. रुवातीला ही बाब कोणाच्या लक्षात आली नाही. मात्र निकम हे जेव्हा थेट महापौरांच्या जवळ जाऊन विरोध करू लागल्याने सभागृहात गोंधळ उडाला. परिस्थितीची गंभीर्यता पाहता निकम यांना सभागृहाबाहेर काढण्याकरिता उपस्थितीत नगरसेवक व शिपाई हे पुढे सरसावले. त्यानंतर निकम यांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सभागृहाच्या बाहेर काढले. विशेष बाब म्हणजे 'आपण तीन तासांपासून प्रेक्षक गॅलरीत बसलेलो असून आपल्याला साधा चहा देखील दिला गेला नसल्याने मी महापौरांचा विरोध करण्यास आलो असल्याचे निकम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. शिवाय आपण स्वतःहून सभागृहत न जाता पालिकेच्याच शिपायाने आपल्याला तिथे नेले असही ते म्हणाले आहेत. सध्या निकम यांना उपायुक्त मारुती गायकवाड यांच्या तक्रारीवरून भाईंदर पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. तसेच पुढील प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पालिकेच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली आहे.