मुंबई : एमएचटी सीईटीच्या पर्सेंटाईल गुणांवरून सुरू झालेल्या वादंगामुळे या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परंतु राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) घेतलेल्या १९ व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांपैकी १२ परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. निकाल जाहीर होऊन आठवड्यापेक्षा जास्त कालावधी उलटला तरी अद्याप या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत सीईटी कक्षाकडून कोणतीही सूचना जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक चिंतीत आहेत.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे विविध १९ अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात येतात. या परीक्षा सुरळीत पार पडल्या. जून महिन्यामध्ये या परीक्षांचे निकाल संकेतस्थळावर जाहीर होऊ लागले. आतापर्यंत एमएचटी सीईटी, बीएस्सी नर्सिंग, डीपीएन / पीएचएन, बी.एचएमसीटी, एम.एचएमसीटी, बीए / बीएस्सी बी.एड आणि विधि पाच वर्ष आदी अभ्यासक्रमांचे निकाल सीईटी कक्षाकडून जाहीर करण्यात आले. या परीक्षांचे निकाल जाहीर होऊन १० ते १५ दिवस उलटले तरी अद्याप सीईटी कक्षाने या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया जाहीर केलेली नाही. एमएचटी सीईटीच्या परीक्षेबाबत निर्माण झालेल्या वादंगामुळे अभियांत्रिकी, कृषी, औषधनिर्माण शास्त्र या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. मात्र अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस विलंब का होत आहे, असा प्रश्न विद्यार्थी व पालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

हेही वाचा >>>आयसीआयसीआय बँक कर्ज घोटाळा प्रकरण : चंदा कोचर यांना दिलासा नाहीच

सीईटी कक्षाने घेतलेल्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील तब्बल १२ लाख ४६ हजार ३९५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ११ लाख ३३ हजार ७०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. एमएचटी सीईटी परीक्षेला सर्वाधिक ६ लाख ७५ हजार ४४५ विद्यार्थी बसले होते. पीसीबी गटातून २ लाख ९५ हजार ५७७, तर पीसीएम गटातून ३ लाख ७९ हजार ८६८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. तसेच बी.एस्सी नर्सिंग या अभ्यासक्रमासाठी ५० हजार २१७ विद्यार्थी, विधि ५ वर्ष या अभ्यासक्रमाची परीक्षा २६ हजार ७५४ विद्यार्थ्यांनी दिली.

प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील माहितीपत्रक अद्याप विविध विभागांकडून आलेले नाही. आरक्षणाबाबत कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. प्रवेश प्रक्रियेच्या माहितीपत्रकासाठी पाठपुरावा सुरू आहे. माहितीपत्रक मिळताच तातडीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल.- दिलीप सरदेसाई, आयुक्त, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष