भारताच्या स्वातंत्र्याचा आणि बेस्ट उपक्रमाच्या महापालिकाकरणाचा अमृत महोत्सव साजरा होत असतानाच १८ ऑगस्ट रोजी मुंबईकरांच्या सेवेत बेस्टची दुमजली वातानुकूलित बसचा दाखल होत आहे. भविष्यात बेस्टच्या ताफ्यातील बसगाड्यांची संख्या १० हजारापर्यंत वाढविण्याचा उपक्रमाचा मानस आहे. या सर्व बसगाड्या विजेवर धावणाऱ्या असतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साधारण १८७३ साली स्थापन झालेल्या या कंपनीने सुरुवातीला वाहतुकीचे साधन म्हणून कुलाबा ते पायधुणीदरम्यान घोड्यांच्या मदतीने चालविली जाणारी ट्राम मुंबईकरांच्या सेवेत आणली. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन ७ मे १९०७ रोजी कुलाबा ते क्रॉफर्ड मार्केट दरम्यान विजेवर धावणारी ट्राम सुरू करण्यात आली. इतकेच नव्हे तर सप्टेंबर १९२० मध्ये दुमजली ट्राम मुंबईतील रस्त्यांवरून धावू लागली. हळूहळू तंत्रज्ञानात बदल होत गेले आणि १५ जुलै १९२६ रोजी मुंबईत पहिली बसगाडी धावू लागली. तिला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला. त्यानंतर ७ ऑगस्ट १९४७ साली महापालिकाकरण झाले आणि त्यालाच ७५ वर्षे पूर्ण झाली. त्यावेळी बेस्ट उपक्रमातील बस गाड्यांची एकूण संख्या केवळ २४२ इतकी होती.

तंत्रज्ञानातील प्रगतीचा फायदा घेऊन बेस्ट उपक्रमाने मुंबईकरांच्या सोयीसाठी अनेक नवनवीन बसगाड्या आपल्या ताफ्यात समाविष्ट केल्या. प्रदुषण कमी करणाऱ्या सीएनजीवरील बसगाड्यांपाठोपाठ प्रदुषणमुक्त अशा विजेवर धावणाऱ्या बसगाड्या बेस्टने आपल्या ताफ्यात समाविष्ट केल्या. सध्या भारतात विजेवर धावणाऱ्या सर्वाधिक बसगाड्या केवळ बेस्टकडेच आहेत. बेस्ट उपक्रमाकडे एकूण ३,६८० बसगाड्या असून भविष्यात एकूण दहा हजार बसगाड्यांचे लक्ष्य ठेवण्यात आल्याची माहिती उपक्रमातील अधिकाऱ्यांनी दिली. भविष्यात बेस्टच्या ताफ्यात केवळ विजेवर धावणाऱ्या बसगाड्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बेस्टकडील बसताफा

डिझेल- ८१९ बस
सीएनजी- २४४० बस
विजेवरील- ३९६ बस
हायब्रीड- २५ बस
एकूण-३६८०

येत्या १८ ऑगस्ट रोजी पहिल्या दुमजली वातानुकूलित बस बेस्टच्या ताफ्यात दाखल होत आहे. त्यानंतर सप्टेंबरपासून ही बस प्रवाशांच्या सेवेत येईल. येत्या एक ते दोन वर्षात एकूण ९०० वातानुकूलित दुमजली बस येणार असून पहिल्या टप्प्यात २०० दुमजली बसचा समावेश करण्यात येणार आहे. यातील १०० बस येत्या डिसेंबरपर्यंत ताफ्यात समाविष्ट करण्याचे उद्दिष्ट आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The first air conditioned double decker bus will run on august 18 mumbai print news amy
First published on: 15-08-2022 at 12:53 IST