मेट्रो ९ च्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन आज आपण केलं आहे. २०१८ मध्ये आपण भूमिपूजन केलं होतं. मुंबई आणि मीरा भाईंदर यांना जोडणारी मेट्रो ही तयार करण्याचं काम सुरु झालं. मागच्या काळात एकनाथ शिंदे आणि मी ट्रायल रनही पाहिला होता. आता आज दहीसर पूर्व ते काशीगाव या ४.४ किमीच्या टप्प्याचं उद्घाटन आपण केलं आहे अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मेट्रो ७ ला कनेक्टिंग मेट्रो म्हणजे मेट्रो ९
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, या टप्प्यात चार स्थानकं आहेत, मेट्रो ७ ला ही कनेक्टिंग मेट्रो झाली आहे. दहीसर पूर्व, मीरागाव, पांडुरंगवाडी आणि काशीगाव अशी चार स्टेशन्स झाली आहेत. आता जो दुसरा टप्पा आहे त्यात साईबाबा नगर ते सुभाषचंद्र बोस मैदान याचंही काम जवळपास ९६ टक्के पूर्ण झालं आहे. काही भाग राहिला आहे, याच वर्षी त्या टप्प्याचं उद्घाटन होईल असा आमचा प्रयत्न आहे. ती मार्गिकाही ४ किमीची आहे. त्यात चार स्थानकं असणार आहे. मुंबई आणि मीरा भाईंदरला जोडण्याचं काम या मेट्रोमुळे होतं आहे. ६ हजार ६०७ कोटी रुपये या प्रकल्पासाठी लागणार आहेत अशी माहितीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
एक तासाचा प्रवास ३० मिनिटांत होणार-मुख्यमंत्री
ज्या प्रवासासाठी किमान एक तास किंवा कधी कधी दोन तास लागतात तो प्रवास ३० मिनिटांत होणार आहे. ही मेट्रो, मेट्रो ७ ला आणि पुढे ती मेट्रो ३ ला जोडली जाते आहे. मीरा भाईंदर ते कुलाबा अशी सीमलेस कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. स्मार्ट कार्ड, कॅशलेस तिकिट अशा सोयीही आपण केल्या आहेत. मला एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली ८० टक्के व्यवहार कॅशलेस आहे. त्यामुळे आपलं जे कार्ड आहे ते यशस्वी झालं आहे. एलईडी लाईटिंग, सौर उर्जा या सगळ्यामुळे हा प्रकल्प हरित प्रकल्प म्हणून गणला जाणार आहे. मेट्रो आणि उड्डाणपूल एका पिलरवर असा प्रयोग आपण पहिल्यांदा नागपूरला केला होता. आता अशीच डबलडेकर फेज आपल्याला मीरा भाईंदरमध्येही पाहण्यास मिळते आहे असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
ठाणे जिल्ह्यात सुरु झालेली पहिलीच मेट्रो-मुख्यमंत्री
ठाणे जिल्ह्यातली ही सुरु झालेली ही पहिली मेट्रो आहे. विशेषतः ही मेट्रो आणि आपण करत असलेला कोस्टल रोड यामुळे पुढच्या काळात वेस्टर्न एक्स्प्रेस वे हा मोठ्या प्रमाणावर डी कंन्जेस्ट होताना पाहण्यास मिळेल. ऑपरेशनल मेट्रोमध्ये आपण देशात दुसऱ्या क्रमाकांवर आलो आहे. दिल्लीपेक्षा मोठं जाळं पुढच्या तीन ते चार वर्षांत उभारणं हे आपलं लक्ष्य आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. सध्या मुंबईत १०० किमीहून अधिक जास्त मेट्रो सुरु आहेत अशीही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
