एखाद्या औषध वापरामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटली तर ते औषध तात्काळ परत घेण्याची वा वितरित झालेला साठा न वापरण्याची सूचना देण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडे तात्काळ यंत्रणा नसल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. हा साठा मागे घेण्याची वा थांबविण्याची प्रक्रिया करण्यास काही दिवसांचा कालावधी लागत असल्याचे प्रशासनाने मान्य केले आहे.

हेही वाचा >>>विनयभंगाच्या आरोपांत महिलेला एक वर्षाची शिक्षा; न्यायालयाचा महत्वाचा निकाल

चर्नी रोड येथील सैफी रुग्णालयात एका रुग्णाला ओरोफेर या इंजेक्शनची तीव्र प्रतिक्रिया होऊन त्या रुग्णाचा मृत्यू झाला. अशाच पद्धतीची प्रतिक्रिया अन्य रुग्णालाही झाली. मात्र त्याच्या जिवावर बेतले नाही. याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली तेव्हा रुग्णालयाकडे असलेल्या साठ्यातील नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. याच औषधाच्या पुण्यात झालेल्या साठ्याचेही नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.रासायनिक विश्लेषणाचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यानंतर ईमक्युअर फार्मास्युटिकल्स कंपनीला तात्काळ कळवून हा साठा थांबविण्यास सांगण्यात आला आहे. परंतु हा साठा देशभरात वितरित झाला आहे. तो थांबविण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने तितकी प्रभावी यंत्रणा नसल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले.

हेही वाचा >>>मुंबईः अश्‍लील चित्रफीतीद्वारे लाखों रुपयांची खंडणी उकळल्या प्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

एका अधिकाऱ्याने सांगितले, `आम्ही पत्र लिहून कंपनीला संबंधित साठा थांबविण्याचे आदेश देतो. कंपनी आपल्या घाऊक पुरवठादाराला कळविले. घाऊक पुरवठादाराने किरकोळ विक्रेत्याला कळवून तो साठा वितरित न करण्याच्या सूचना देतो. हा साठा प्रशासनाकडे जमा होणे आवश्यक आहे. २४ नोव्हेंबरपर्यंत ४६७ व्हायलचा साठा प्रशासनाकडे जमा झाला आहे. ही आकडेवारी तुटपुंजी आहे. कंपनीने राज्यातील घाऊक व्यापाऱ्यांना किती साठा पुरविला आहे याची माहिती मागविण्यात आली आहे. याचा अर्थ प्रशासनाकडे याबाबत ठोस माहिती नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या संपूर्ण यंत्रणेवर प्रशासनाचे थेट नियंत्रण नाही. तसेच कंपनीमार्फत या सूचना प्रत्यक्ष खाली पोहोचल्या की नाही याची शहानिशा करणे शक्य नसते.याबाबत औषध नियंत्रकांना कळवून देशभरातील साठा परत घेण्याच्या सूचना करण्यात येतात. मात्र ही प्रक्रिया विलंबाची व संदिग्ध असल्याचे या अधिकाऱ्यानेही मान्य केले.

हेही वाचा >>>पासपोर्टसाठी बनावट कागदपत्र सादर करणार्‍या त्रिकुटाला अटक

ॲानलाईनच्या युगात सर्व फार्मास्युटिकल्स कंपन्या अद्ययावत असल्या तरी अन्न व औषध प्रशासन तितके सुसज्ज नाही. एखादे औषध घातक ठरले तर त्याचा पुरवठा व वितरीत केलेले औषध तात्काळ थांबविण्याच्या प्रक्रियेवर प्रशासनाचे नियंत्रण नाही हेही या अधिकाऱ्याने मान्य केले. त्यात बदल होण्याची आवश्यकता या निमित्ताने त्याने व्यक्त केली.याबाबत अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांना विचारले असता, या प्रक्रियेत त्रुटी आहेत हे त्यांनी मान्य केले. एखादे औषध घातक ठरले तर ते तात्काळ थांबविण्याची व संपूर्ण साठा त्या त्या प्रशासनाकडे परत आला पाहिजे. या दृष्टीने हालचाली निश्चितच केल्या जातील, असेही काळे यांनी सांगितले.