मुंबईत करोनाची चौथी लाट ओसरण्यास सुरुवात; रुग्णसंख्येसह बाधितांच्या प्रमाणात घट

मुंबईत दैनंदिन करोनाबाधितांच्या रुग्णसंख्येसह बाधितांच्या प्रमाणात घट होत असून करोनाची चौथी लाट ओसरायला सुरुवात झाली आहे.

करोना,corona
( संग्रहित छायचित्र )

मुंबई : मुंबईत दैनंदिन करोनाबाधितांच्या रुग्णसंख्येसह बाधितांच्या प्रमाणात घट होत असून करोनाची चौथी लाट ओसरायला सुरुवात झाली आहे. परिणामी, उपचाराधीन रुग्णसंख्येचा आलेखही उताराला लागला आहे.

करोनाची तिसरी लाट फेब्रुवारीत ओसरली. त्यानंतर मार्चमध्ये दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख हा ५० च्या खाली गेला. एप्रिलअखेरीस यात थोडी वाढ व्हायला लागली होती. त्यावेळी दैनंदिन रुग्णसंख्या १०० वर पोहोचली. मे महिन्यात करोनाचा प्रादुर्भाव संथगतीने वाढत होता. परंतु मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात याने थोडा वेग घेतला. परिणामी या काळात दैनंदिन सुमारे साडे तीनशेहून अधिक रुग्ण नव्याने आढळायला लागले. या काळात सुमारे दहा हजारांच्या आतच दैनंदिन चाचण्या करण्यात येत होत्या.

करोनाचा प्रसार होत असल्याचे लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने चाचण्या वाढविण्यास सुरुवात करताच जूनमध्ये रुग्णसंख्याही वेगाने वाढू लागली. जून महिन्यात तर पावसाळ्यामुळे अन्य विषाणूजन्य आजार आणि करोना या दोन्हीचा प्रसार वेगाने सुरू झाला. या काळात आठ दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट होत होती. जूनमध्ये तर दैनंदिन रुग्णसंख्येने दोन हजारांचा टप्पा पार केला. या काळात बाधितांचे प्रमाण २२ टक्क्यांवर गेले होते. परंतु जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून करोनाचा प्रसार कमी होत असल्याचे निदर्शनास आले.

जूनच्या शेवटच्या आठवड्यांमध्ये दैनंदिन रुग्णसंख्या दोन हजारांवरून सुमारे १२०० पर्यंत खाली आली. तसेच बाधितांच्या प्रमाणातही घसरण होऊन ११ टक्क्यांवर आले. दैनंदिन बाधितांच्या तुलनेत आता करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्याही वेगाने कमी होत आहे. या लाटेमध्ये जूनमध्ये उपचाराधीन रुग्णांच्या संख्येने सुमारे १४ हजारांचा टप्पा गाठला होता. परंतु आता हे प्रमाण ११ हजारांच्या खाली आले आहे.

१५ जुलैपर्यत रुग्णसंख्या ओसरण्याची शक्यता

मुंबईत आलेली ही लाट आता निश्चितच ओसरायला सुरुवात झाली आहे. साधारण पुढील दोन आठवड्यांमध्ये म्हणजे १५ जुलैपर्यत करोनाचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी कमी होईल. त्यामुळे चिंतेचे कारण नाही, असे करोना कृती दलाचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The fourth wave of the corona begins to recede in mumbai decrease in infected with the number of patients mumbai print news amy

Next Story
“मतदारांच्या मताचा बाजार…,” उद्धव ठाकरेंनी जाहीर केली नाराजी; म्हणाले “लोकशाहीचे धिंडवडे थांबवण्याची गरज”
फोटो गॅलरी