महापौर निधीतीत ‘टक्क्यां’च्या आरोपाबाबत स्नेहल आंबेकर यांचे स्पष्टीकरण
आगामी अर्थसंकल्पाच्या निमित्ताने प्रशासनाकडून देण्यात आलेल्या महापौर निधीच्या वाटपात महापौर स्नेहल आंबेकर यांनी टक्के घेतल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आला आहे. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आखलेल्या निकषानुसार आपण विरोधी पक्षांना निधीचे वाटप केल्याचे स्पष्टीकरण स्नेहल आंबेकर यांनी दिल्यामुळे शिवसेनेसह सर्वच पक्षांच्या नगरसेवकांमध्ये खळबळ उडाली आहे. थेट ‘मातोश्री’ने निधी वाटपात लक्ष घातल्याबद्दल पालिका वर्तुळामध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
दरवर्षी पालिका सभागृहात आगामी वर्षांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देताना मुंबईत विकासकामे करण्यासाठी प्रशासनाकडून महापौरांना विशेष निधी दिला जातो. महापौर हा निधी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना संख्याबळानुसार उपलब्ध करतात. गेल्या वर्षी महापौर स्नेहल आंबेकर यांना प्रशासनाने १०० कोटी रुपये महापौर निधी दिला होता. त्या वेळी मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांच्याबरोबर मोबाइलवर झालेल्या निधी वाटपाबाबतचे संभाषण प्रसारमाध्यमांना उपलब्ध केल्यानंतर गोंधळ उडाला होता. यंदा पालिका आयुक्त अजय मेहता यांनी महापौरांना केवळ ५० कोटी रुपये महापौर निधी उपलब्ध केला आहे. महापौरांनी त्यापैकी ३५ कोटी रुपये शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वितरित केले. मित्रपक्ष भाजपला १० कोटी रुपये दिले. तर राष्ट्रवादी, काँग्रेस, समाजवादी पार्टीला अनुक्रमे २ कोटी, १.९६ कोटी आणि ५० लाख रुपये निधी देण्यात आला आहे. टक्के देण्यास तयार नसल्याने विरोधकांना कमी निधी देण्यात आल्याचा आरोप काँग्रेस आणि मनसेकडून करण्यात आला आहे.
संदीप देशपांडे यांनी आपल्याकडे पत्र दिले नव्हते, मात्र तरीही आपण मनसेच्या नगरसेवकांना निधी दिला. तसेच निधी देण्याबाबत उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेअंती निकष ठरविण्यात आले. त्यानुसारच निधीचे वाटप केले आहे, असे आंबेकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट करीत विरोधकांचा आरोप फेटाळून लावला.

काँग्रेस नगरसेवकांनी निधीसाठी दिलेली पत्रे महापौरांकडे सादर केली. परंतु त्यामध्ये टक्के देण्यास तयार नसल्याने काँग्रेसला कमी निधी देण्यात आला. प्रत्येक नगरसेवकाला ३.९८ लाख रुपये निधी मिळाला आहे. त्यात कोणतीही कामे होऊ शकणार नाहीत. त्यामुळे हा निधी महापौरांना परत करण्याचा विचार सुरू असून ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.
– प्रवीण छेडा, विरोधी पक्षनेते
..
गेल्या वर्षी महापौर निधीतील टक्केवारी उघडकीस आणली होती. त्यामुळे यंदा स्नेहल आंबेकर यांनी आपल्याशी संपर्कच साधला नाही. म्हणूनच आपल्याला डावलून त्यांनी परस्पर मनसेच्या नगरसेवकांना महापौर निधी दिला. शिवसेना नगरसेवकांना बक्कळ निधी देत विरोधकांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत. त्यामुळे नगरसेवक निधी परत करण्याच्या विचारात आहेत.
संदीप देशपांडे, गटनेते मनसे